काजूबोंडूवरील वाइन निर्मिती प्रकल्पाला चालना देणार -पणन मंत्री जयकुमार रावल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 18:25 IST2025-04-12T18:24:50+5:302025-04-12T18:25:39+5:30
काजू अनुदानातील शेतकरी वंचित राहणार नाहीत

काजूबोंडूवरील वाइन निर्मिती प्रकल्पाला चालना देणार -पणन मंत्री जयकुमार रावल
कणकवली : सिंधुदुर्ग बाजार समितीच्या या मार्केट यार्डमधून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केला जाईल. पुढील १८ महिन्यांत या इमारतींचे काम पूर्ण करत लोकार्पण होण्यासाठी सर्वांना काम करावे लागेल. येथील काजू बागायतदार शेतकऱ्यांसाठी येथे वाइन निर्मितीचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आवश्यक आहे. त्यामुळे ३७० कोटी रुपयांच्या काजू वाइन प्रकल्पाला पुढील काळात चालना दिली जाईल. मार्केट यार्डच्या पहिल्या टप्प्यातील इमारतींसाठी ५ कोटी ६६ लाख रुपये लागणार असून, त्यापैकी ७५ टक्के रक्कम सिंधुरत्न योजनेमधून देण्यात आली आहे, तर ॲग्रीकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चरमधून १ कोटीची रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाघेरी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या मार्केट यार्डच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, शिंदेसेनेचे उपनेते संजय आग्रे , राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी आमदार अजित गोगटे उपस्थित होते
१५ दिवसांत आंबा महोत्सव घ्यावा
मंत्री रावल म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आमच्या विभागामार्फत काजूबोंडू प्रकल्प, फळप्रक्रिया योजना, कात प्रकल्प असे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. पणनमार्फत आंबा व मत्स्य वाहतुकीसाठी तरुणांना १० कोल्डस्टोरेज ट्रक देण्यात येणार आहेत. दरवर्षी आंबा महोत्सव आम्ही मुंबई आणि पुण्यामध्ये भरवतो. त्याच धर्तीवर येत्या १५ दिवसांत कृषी उत्पन्न बाजार समितीने आंबा महोत्सव घ्यावा, त्यासाठी पणनकडून १ लाख रुपयांची आम्ही मदत करू. कुडाळ-मालवण मतदारसंघात आमदार नीलेश राणेंच्या मागणीनुसार पॅकिंग हाऊसची योजना करण्यात येईल. येत्या १८ महिन्यांत काम पूर्ण करू आणि मार्केट यार्डचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री, तसेच अन्य मंत्र्यांना आमंत्रित करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
त्यांच्यावर कडक कारवाई करावी
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, नारायण राणेंनी जे काही विचार येथे मांडले आहेत, त्यानुसार त्यांचा ७५ व्या वाढदिवस साजरा केला जाईल तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न हे ४ लाख झाले पाहिजे. देवगड आणि वेंगुर्लेच्या नावाने बाहेरील राज्यातील आंबे विकले जात आहेत. त्यामुळे कृषी आणि पणन अधिकाऱ्यांना सूचना करतो की, त्याच्यावर कडक कारवाई करावी. निवडणुका संपलेल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचे हेवेदावे, राजकारण न करता जिल्ह्यासाठी जे काय करायचे आहे, ते मी करणार आहे.