माकडतापावरील लसीसाठी केंद्राला प्रस्ताव पाठविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 04:07 PM2020-02-19T16:07:43+5:302020-02-19T16:10:03+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढते माकडतापाचे रुग्ण लक्षात घेता माकडतापावरील लस केंद्राकडून उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारला लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. याबाबत ओरोस येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चाही झाली आहे
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढते माकडतापाचे रुग्ण लक्षात घेता माकडतापावरील लस केंद्राकडून उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारला लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. याबाबत ओरोस येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चाही झाली आहे. तसेच व्हायरॉलॉजी लॅब एप्रिलमध्ये सुरू होणार असून, त्यामुळे वेगवेगळ््या आजारांची लक्षणे वेळेत मिळतील आणि उपचार पद्धती सोप्या होणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास यांनी दिली.
डॉ. व्यास यांनी मंगळवारी दुपारी सावंतवाडी कुटीर रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर येथील विविध समस्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर तसेच अन्य नागरिकांनी मते मांडली. यावेळी आरोग्य उपसंचालक हेमंत बोरसे, जिल्हा शल्यचिकित्सक धनंजय चाकुरकर, सावंतवाडीचे वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वर दुर्भाटकर, अभिजीत चितारी, डॉ. बागवान, संदीप सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. व्यास म्हणाले, सावंतवाडी, दोडामार्ग परिसरात माकडतापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. माकडतापावर लस उपलब्ध आहे. पण ती मिळावी यासाठी केंद्र सरकारला लवकरच एक प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या ओरोस येथील बैठकीत चर्चाही झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी आरोग्याच्या समस्येवर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना दिली आहे. त्याप्रमाणे काम सुरू असल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.
व्हायरॉलॉजी लॅबचे काम सुरू आहे. हे कामही एप्रिलमध्ये पूर्ण होणार असून, नंतर कोणतीही रक्तचाचणी बाहेर जाऊन करण्याची गरज भासणार नाही. सर्व रक्तचाचण्या एकाच ठिकाणी होतील. माकडतापावरील रक्त चाचणीची समस्याही यातून सुटून जाईल. काम लवकरात लवकर करण्याचे आदेश दिले आहेत, असेही डॉ. व्यास म्हणाले.
मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडीतच होणार
सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे काम लवकरच सुरू होणार आहे. जागेचा वाद मिटल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. सावंतवाडीतून हे रुग्णालय अन्यत्र हलविले जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. मात्र, जागेचा वाद लवकरच मिटावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मसुरकर यांनी अपुऱ्या कर्मचारीवर्गामुळे आरोग्य अधिकाऱ्यांवर येणाऱ्या ताणाबाबत सचिवांकडे गाऱ्हाणे मांडले. मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू झाले की या सर्व समस्या सुटतील, असे डॉ. व्यास यांनी स्पष्ट केले.