चिरेखाणी ठरणार आता पाणीसाठवण टाक्या!

By admin | Published: August 26, 2016 12:38 AM2016-08-26T00:38:21+5:302016-08-26T01:13:02+5:30

जीवनदायी : चार नद्यांचे होणार पुनरुज्जीवन

Will take care of water storage tank! | चिरेखाणी ठरणार आता पाणीसाठवण टाक्या!

चिरेखाणी ठरणार आता पाणीसाठवण टाक्या!

Next

शोभना कांबळे -- रत्नागिरी --जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी राज्य पाणीटंचाईमुक्त करण्याची घोषणा केली असून, कोकणातील चार नद्यांचे पुनरूज्जीवन करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर कोकणात चिरेखाणी दुरूस्ती करून पाणी साठवण्यासाठी योजना राबवली जाणार असल्याचेही सुतोवाच केले आहे. रिकाम्या झालेल्या चिरेखाणींना यामुळे सुगीचे दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास या चिरेखाणी जीवघेण्या ठरण्याऐवजी जीवनदायी बनतील.
कोकणात अनेक ठिकाणी चिरेखाणी आहेत. चिरे काढून झाले की, खाणी तशाच उघड्या ठेवल्या जातात. चिऱ्यांचे उत्खनन पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्या बुजवून टाकणे किंवा त्यांच्या भोवती कुंपण घालण्याचे बंधन चिरेखाणीला परवानगी देतानाच घालण्यात आले आहे. ही अट मान्य असलेल्या चिरेखाणमालकांनाच परवाने दिले जातात. याचे कुणीही पालन करत नाहीच, परंतु त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस प्रशासनाकडून दाखवले जात नाही.
चिरेखाण मालकांकडून याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे. अनेक भागात अशा रिकाम्या चिरेखाणी उघड्या असल्याचे दिसून येते. वर्षानुवर्षे या चिरेखाणी उघड्या राहिल्याने पावसाळ्यात पाण्याने तुडुंब भरतात. पावसाळ्यात पाण्याने भरलेल्या या चिरेखाणींमध्ये जनावरे पडून मृत झाल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. त्याचबरोबर अनेक व्यक्तींचेही बळी गेले आहेत. मात्र, त्याची दखल ना चिरेखाण मालकांकडून घेतली जात ना प्रशासनाकडून!
मुसळधार पाऊस पडत असल्याने पाण्याने भरलेल्या चिरेखाणीत पडून वेळवंड येथील महिलेचा मृत्यू झाला. ही घटना महिनाभरापूर्वीच घडली. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्ह्यात परवानाधारक पण रिकाम्या झालेल्या चिरेखाणी बंदिस्त करण्याचा प्रयत्न किती चिरेखाण मालकांकडून झाला, किती खाणी उघड्या आहेत, याचा अहवाल गोळा करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली होती. मात्र, त्याबाबत कोणती कार्यवाही पुढे करण्यात आली, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
पाऊस मुसळधार पडला तरी पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता येथील जमिनीत नसल्याने जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांपासूनच कोकणात काही ठिकाणी पाणीटंचाईला सुरूवात होते. त्यामुळे अशा उघड्या असलेल्या चिरेखाणींचा उपयोग पावसाचे पाणी साठवण्यासाठी केल्यास पाणीटंचाईवर काहीअंशी मात करता येईल.
यासाठी शासनाने घोषणाच न करता अशा रिकाम्या असलेल्या चिरेखाणींचे सर्वेक्षण करून त्याची अंमलबजावणी करायला हवी, तरच रिकाम्या असलेल्या या धोकादायक चिरेखाणी ‘जीवन’दायी ठरतील.


रिकाम्या झालेल्या चिरेखाणींचा उपयोग पाणी साठवण्यासाठी चांगल्या रितीने होऊ शकेल, असं झालं तर या जीवघेण्या चिरेखाणी जीवनदायी ठरतील, अशा आशयाचे वृत्त ३० जुलै रोजी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सेवानिवृत्त प्राध्यापक श्रीधर शेंड्ये यांनी चिरेखाणींभोवती बंदिस्त कुंपण घालून त्यांचा उपयोग पावसाळ्यातील जलसंचयासाठी केला तर या चिरेखाणी घातक न ठरता उपयुक्त ठरतील, यासाठी संबंधित यंत्रणेने सकारात्मक भूमिका घ्यायला हवी, असे मत मांडले होते. आता शासनाला उशिरा का होईना पण याबाबतचे शहाणपण सुचले, असेच म्हणायला हवे.

उत्खनन करून झाले की, त्या तशाच उघड्या ठेवल्या जातात, अशा अनेक खाणी रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. या रिकाम्या चिरेखाणींमध्ये पावसाळ्याच्या दिवसात पडून मृत्यू होण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. त्यामुळे या उघड्या चिरेखाणींचा विषय ऐरणीवर असतानाच जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी चिरेखाणी दुरूस्ती करून पाणी साठवण्यासाठी योजना राबवली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु ही केवळ घोषणाच न राहता, त्याची अंमलबजावणीही करावी.


कोकणात अनेक ठिकाणी चिरेखाणी उघड्या.
अटीचे पालन होत नसल्याने चिरेखाणी ठरताहेत जीवघेण्या.
मालक अन् प्रशासनाकडूनही दखल घेतली जात नसल्याने जात होते अनेकांचे बळी.
चिरेखाणी बंदिस्त करण्याकडे दुर्लक्ष.
प्रशासनाकडून अहवाल गोळा करण्यास प्रारंभ.

Web Title: Will take care of water storage tank!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.