सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार - सुधीर सावंत
By सुधीर राणे | Published: March 2, 2023 04:29 PM2023-03-02T16:29:54+5:302023-03-02T16:30:15+5:30
कुठल्याही विकास कामासाठी ज्यावेळी विलंब होतो, त्या ठिकाणी एक रुपयाचा खर्च एक हजार रुपयात रुपांतर होतो
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक धरणे व प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे एकप्रकारे विकासावर परिणाम होत असून ते प्रकल्प प्रथम पूर्ण करण्याकडे आमच्या पक्षाचा कल राहणार आहे. त्यानंतरच नवीन प्रकल्प अथवा विकास कामे हाती घ्यावीत, असे आमचे म्हणणे असून त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत लवकरच एक बैठक घेण्यात येऊन त्यांचे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात येईल अशी माहिती शिवसेनेचे नेते माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी येथे दिली.
कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, कलमठ शहरा प्रमुख प्रशांत वनसकर, भास्कर राणे यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
सुधीर सावंत म्हणाले, जिल्ह्यातील टाळंबा, नरडवे यासह अन्य धरणांची कामे अपूर्ण आहेत. नरडवे धरणाची अद्याप घळ भरण झालेली नाही.ही कामे पूर्ण होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. गांधीनगर, नावळे, दिंडवणे यासह काही धरणांना पूर्वीच्या राज्य सरकारने स्थगिती दिली होती. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ती उठवली आहे.
कुठल्याही विकास कामासाठी ज्यावेळी विलंब होतो, त्या ठिकाणी एक रुपयाचा खर्च एक हजार रुपयात रुपांतर होतो. त्यामुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे.नरडवे धरण प्रकल्प अनेक वर्षे चालू राहिल्याने कणकवलीतील काही जागांवर अजूनही आरक्षण कायम आहे.त्यामुळे येथील विकासात अडसर निर्माण झाला आहे. कुडाळ येथील आकारीपड प्रश्न प्रलंबित आहे. मच्छिमारांचे प्रश्न अजूनही कायम आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील समुद्रातील मत्स्य व विविध प्राणी मारून टाकले जात आहेत.
सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा मी खासदार असताना झाला असला तरी आजपर्यत येथील प्रगती म्हणावी तशी झालेली नाही.न्याहारी निवास व्यवस्था करणाऱ्या व्यवसायिकांची संख्या वाढली आहे.त्यांचे पंचतारांकित हॉटेल मध्ये रुपांतर झाले पाहिजे. समुद्र किनारट्टीवरील प्रत्येक गावात जेटी झाली पाहिजे.त्याचा प्रवासासाठी आणि मासेमारीसाठी वापर करता आला असता.मात्र, त्याकडेही दुर्लक्ष झाले आहे.
शेती करत असताना जास्त उत्पन्न वाढीसाठी आंबा, काजू मध्ये विषारी खते वापरून आवश्यक गुणधर्म मारून टाकले जात आहेत.त्यामुळे आता अनेक शेतकरी अडचणीत आहेत. नैसर्गिक शेती साठी मी गेली आठ वर्षे लढा दिल्यानंतर सरकारने नैसर्गिकदृष्टया शेती करण्यास मान्यता दिली आहे.
देवबाग सारखा किनारपट्टी भाग समुद्रात बुडायला आला आहे. त्यामुळे किनारपट्टी संरक्षण करण्यासाठी ठोस कार्यक्रम राबविला पाहिजे. पहिल्यांदाच आता मुखमंत्री एकनाथ शिंदे किनारपट्टीकडे लक्ष देत आहेत. त्यांच्या माध्यमातून ठोस कार्यक्रम देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.दर महिन्याला आम्ही याबाबतचा प्रगती अहवाल प्रसिद्धी माध्यमातून जनतेला देवू असेही सुधीर सावंत यांनी यावेळी सांगितले.