‘म्हाडा’च्या पाणीटंचाई लढ्याला न्याय मिळणार का ?
By admin | Published: May 31, 2016 11:16 PM2016-05-31T23:16:55+5:302016-06-01T01:02:05+5:30
प्रशासन जबाबदारी झटकतेय : पाणी, स्वच्छता, देखरेख आदींच्या विळख्यात अडकलीय म्हाडा वसाहत, शासनाने समस्या सोडविण्याची मागणी
सिद्धेश आचरेकर-- मालवण कुंभारमाठ येथील म्हाडा वसाहत अनेक समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत हक्काच्या घरात आलेल्या मुंबईस्थित नागरिकांना अनेक संकटांचा मुकाबला करावा लागत आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पाण्याची फारच मोठी वानवा आहे. याबाबत स्थानिक ‘सिंधुदर्शन’ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्यावतीने सर्व संबंधित कार्यालयात पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. तसेच ममता रविकांत पालव यांनीही म्हाडा वसाहतीतील पाणी प्रश्नी २००५ पासून लढा सुरु केलाय. मात्र त्यांच्या या लढ्याला ना म्हाडा न्याय देत आहे ना ग्रामपंचायत. त्यामुळे आक्रमक बनलेल्या पालव यांनी म्हाडा वसाहतीतील समस्या मार्गी न लावल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मालवण शहरापासून चार किमी अंतरावरील कुंभारमाठ शासकीय तंत्रनिकेतन मार्गावर ‘म्हाडा’ गृहनिर्माण संस्था २००५ साली उभारण्यात आली. यात २७० सदनिका असून बरेच नागरिक हे कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहेत. वर्षातून एकदा मे महिन्यात म्हाडा वसाहतीत वार्षिक सत्यनारायण महापूजा असते. यानिमित्त सर्व रहिवासी मुंबई येथून म्हाडा वसाहतीत उन्हाळी सुट्टीत राहण्यास येतात. मात्र म्हाडा वसाहतीला पाणी पुरवठा करणारी विंधन विहीर अक्षरक्ष: गाळाने भरली असल्याने मे महिन्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथून नागरिकांना पर्यायी पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, यासाठी नागरिकांनी म्हाडाचे अधिकारी तसेच कुंभारमाठ ग्रामपंचायत प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत प्रत्यक्ष भेट घेवून वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र ही दोन्ही कार्यालये एकमेकांकडे बोट दाखवून जबादारी झटकत असल्याची बाब समोर आली आहे.
आठ दिवसांपूर्वी कुंभारमाठ येथील डोंगुर्ला तलावाच्या गाळ उपसाचा प्रारंभ करण्यासाठी आले होते. त्यावेळी म्हाडा वसाहतीला भेट देत समस्या जाणून घेतली असे वाटले होते. मात्र आमदारांनी आमचा भ्रमनिरास केल्याचाही ममता पालव यांनी सांगितले. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन त्वरीत येथील रहिवाशांच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.
म्हाडाकडून देखभालीकडे दुर्लक्ष
मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील म्हाडा वसाहतीतील २७० सदनिकांची घरपट्टी कुंभारमाठ ग्रामपंचायतीकडून आकारली जाते. नव्या नियमाप्रमाणे यावर्षी ९७६ रुपये इतकी घरपट्टी भरली आहे. तर म्हाडाकडून महिन्याला ३५७ रुपये इतका देखभाल कर (मेंटनन्स) आकाराला जातो. एक दिवस कर उशिरा भरल्यास नियमावर बोट ठेवत दंड आकाराला जातो. असे असताना ३५७ रुपयातील ५० रुपयांची देखभाल केली जात नाही. त्याचा फटका येथील रहिवाशांना बसत आहे. त्यामुळे याकडे शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.
- ममता पालव,
म्हाडा, रहिवासी