राज्यातील सर्व ४८ जागांवर विजय मिळविणार, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा विश्वास
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 20, 2023 07:10 PM2023-07-20T19:10:52+5:302023-07-20T19:11:21+5:30
भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा प्रवास योजनेंतर्गत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते चांगले काम करत आहेत. तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगतानाच आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागांवर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास गुरुवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा प्रवास योजनेंतर्गत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. ऑगस्ट २०२२ मध्ये सुरू झालेल्या या योजनेंतर्गत मिश्रा यांचा हा तिसरा दौरा असून त्यांनी गुरुवारी पक्षीय कार्यकर्ते आणि जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी प्रदेश सचिव प्रमोद जठार, लोकसभा प्रवास योजना संयोजक तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संध्या तेर्से आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अजय कुमार मिश्रा म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा प्रवास योजनेंतर्गत मला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात जाण्याची संधी मिळाली. या योजनेंतर्गत पक्ष संघटन मजबूत करतानाच आम्ही जनतेची कामे करण्यावर भर दिला.
केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आपले कार्यकर्ते, पदाधिकारी करत आहेत याचे समाधान आहे. त्यांनी पक्ष वाढीसाठी चांगले काम केले असून जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही त्यांचे विशेष प्रयत्न असल्याचे आजच्या दौऱ्यात दिसून आले. तसेच जिल्ह्यासह राज्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मेहनत पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील ४८ जागांवर भाजपाचा उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात जिल्ह्याचे काम चांगले
जिल्हा दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी केंद्रीय योजनांचा आढावा घेतला. यावेळी केंद्राच्या क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याने चांगले काम केले असल्याचे सांगत हा जिल्हा क्षयरोग मुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे आवर्जून सांगितले.
ते आमच्यासोबत आले तरी त्यांची चौकशी होणारच
ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केले होते त्यातील अनेक आमदार भाजपासोबत आले आहेत. त्यामुळे आता त्यांना भ्रष्टाचारातून क्लिनचीट दिली जाणार का ? या प्रश्नावर बोलताना मिश्रा म्हणाले की भाजपासोबत आले म्हणून कोणाला क्लिनचीट मिळत नाही. ते आमच्यासोबत असले तरी त्यांच्या कारभाराची चौकशी केली जाणार असल्याचे यावेळी सांगितले