पाडव्याचा मुहूर्त हुकणार?
By admin | Published: March 4, 2015 09:49 PM2015-03-04T21:49:45+5:302015-03-04T23:39:15+5:30
संजय पानसरे : वाशी मार्केटमध्ये ७ हजार आंबा पेट्या रवाना
रत्नागिरी : दरवर्षी गुढी पाडव्याला मोठ्या प्रमाणात मुंबईतील मार्केटमध्ये विक्रीला जाणाऱ्या आंब्याचा मुहूर्त यावर्षी हुकणार असल्याचे दिसून येते. सध्या किरकोळ स्वरूपात आंबा मुंबई मार्केटमध्ये दाखल झाला आहे. वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील मिळून एकूण ७ हजार पेटी बुधवारी दाखल झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आवक चांगली असल्याचे संजय पानसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जानेवारी महिन्यापासून एखाद दुसरी किरकोळ आंबा पेटी मार्केटमध्ये विक्रीला येत आहे. दररोज आंबा विक्रीला येत असला तरी प्रमाण कमी आहे. दरवर्षी गुढी पाडव्यानंतर आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढते. दररोज ५० हजारापेक्षा अधिक आंबापेट्या विक्रीस दाखल होतात. मात्र, अवकाळी पावसामुळे यावर्षी गुढी पाडव्याचा मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर अवकाळी पावसाचा परिणाम झाला असून, पीक धोक्यात आले आहे. फुलोऱ्यामध्ये पाणी साचल्याने कुजण्याबरोबर फळे गळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय जो आंबा मोठा होता त्या आंब्यावर काळे डाग पडण्याबरोबर आंबा देठाजवळ कुजून गळण्याचा संभव आहे. गेले दोन दिवस कडकडीत ऊन पडत असले तरी हवेत मात्र गारवा आहे. त्यामुळे तुडतुडा वाढण्याची भीती आहे. त्यामुळे भुरी तसेच तुडतुड्यापासून संरक्षण करण्यासाठी अजून फवारणी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
तयार आंबा शेतकऱ्यांनी बाजारात पाठविण्यास सुरूवात केली आहे. परंतु प्रमाण अल्प आहे. आंबा पेटीला सध्या २ ते ५ हजार रूपये दर मिळत आहे. यावर्षी अवकाळीमुळे बहुतांश पीक नष्ट झाल्याने प्रमाण अल्प आहे. त्यामुळे दर टिकून राहील, अशी अपेक्षा आहे. मुंबई शहरात आंब्याची सर्वाधिक विक्री उत्तर प्रदेशातील भय्ये करतात. होळीचा सण साजरा झाल्यानंतर भय्ये मुंबईत दाखल होतात. त्यामुळे यावर्षी १५ मार्चपर्यंत येण्याची शक्यता आहे. शिवाय २० मार्चपासून आंबा मार्केटमध्ये वाढण्याची अपेक्षा असल्याचे पानसरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दरवर्षी पाडव्यानंतर आंब्याची आवक होते मोठ्या प्रमाणात.
दररोज ५० हजारपेक्षा अधिक आंबापेट्या विक्रीस उपलब्ध होतात.
अवकाळी पावसामुळे यंदा गुढी पाडव्याचा मुहूर्त हुकणार ?
अवकाळी पावसामुळे ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर परिणाम.
तुडतुडा रोग वाढण्याची भीती.