अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती
By admin | Published: April 5, 2015 12:52 AM2015-04-05T00:52:25+5:302015-04-05T00:52:25+5:30
मच्छिमारी ठप्प : मुंबई, गुजरातमधील नौका देवगड बंदरात
पुरळ (ता.देवगड) : अरबी समुद्रामध्ये उत्तरेकडील वाऱ्याचा जोर वाढून वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने मुंबई, गुजरात भागातील मच्छिमार नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. यामुळे मच्छिमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. अचानक उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर समुद्रामध्ये वाढून वादळ परिस्थिती निर्माण झाल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टी भागातील नौका त्या-त्या बंदरांमध्ये सुरक्षित ठिकाणी दाखल झाल्या आहेत.
देवगड बंदरामध्ये मुंबई, गुजरातमधील बऱ्याचशा नौका सुरक्षिततेसाठी दाखल झाल्या आहेत. स्थानिक नौकांनीही देवगड बंदरामध्ये आश्रय घेतला आहे. यावर्षी मत्स्य व्यवसायावर दुष्काळ ओढवला असतानाच समुद्रामध्ये वादळी वारे वाहून मत्स्य व्यावसायिकांच्या समस्या वाढत आहेत. (वार्ताहर)
आचऱ्यात घरावर झाड पडून नुकसान
आचरा परिसरात गेले दोन दिवस जोरदार वारा सुटल्याने आचरा-गाऊडवाडी येथील जॉनिता फर्नांडीस यांच्या घराच्या मागील बाजूस पडवीवर शनिवारी सकाळच्या सुमारास माडाचे झाड कोसळले.
पडवीच्या छपरावरील कौले, वासे, टीव्हीची डिश मोडून दोन हजार रुपयांचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
याबाबतची माहिती मिळताच आचरा तलाठी मुंबरकर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, ग्रामसेवक संतोष गावडे यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीबाबत पंचनामा केला.