शिवसेनेने वैभव नाईकांचे पंख छाटले, फक्त दोन तालुक्यांचे कारभारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 01:33 PM2019-07-28T13:33:26+5:302019-07-28T13:35:02+5:30
गेले काही दिवस शिवसेनेत जिल्हाप्रमुख बदलाचे वारे वाहू लागले होते, त्यावर रविवारी शिक्कामोर्तब झाले.
सावंतवाडी : गेले काही दिवस शिवसेनेत जिल्हाप्रमुख बदलाचे वारे वाहू लागले होते, त्यावर रविवारी शिक्कामोर्तब झाले. सध्याचे विद्यमान आमदार आणि जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत असलेले वैभव नाईक यांच्यावर आता कुडाळ, मालवण या दोन तालुक्यांच्या जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी राहणार आहे, तर नवीन जिल्हा प्रमुख म्हणून संजय पडते यांची नेमणूक करण्यात आली आहे, त्यांच्यावर कणकवली व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पडते हे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत तसेच त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे शिवसेनेत असताना ही जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली होती.
ते जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून ही कार्यरत होते. मागील लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी राणेशी फारकत घेऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर जिल्ह्यातील आठही तालुकाप्रमुखांची तसेच उपजिल्हाप्रमुख यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत बैठक झाली होती, या बैठकीत वैभव नाईकांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी केल्या होत्या.
त्यावेळीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैभव नाईक ना संघटनेच्या कामात लक्ष न घालता मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले होते, त्यावेळीच सिंधुदुर्गचा जिल्हाप्रमुख बदलणार हे निश्चित झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाप्रमुख कोण यावर चर्चा सुरू होती. ठाकरे यांनी इच्छुकांच्या नावांची यादीही घेतली होती. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांशी व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून शनिवारी रात्री उशिरा पडते यांचे नाव जाहीर केले.