पंचायत राज अभियानातील विजेत्यांचा गौरव
By admin | Published: March 15, 2015 09:44 PM2015-03-15T21:44:05+5:302015-03-16T00:16:11+5:30
जिल्ह्याचा सन्मान : राज्यपालांच्या हस्ते मुंबईत सन्मानपत्र प्रदान
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने यशवंत पंचायत राज अभियानात महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकावला होता तर पंचायत समिती सवर्गात राज्यात देवगड पंचायत समितीने दुसरा क्रमांक मिळविला होता तर ग्रामपंचायत स्तरावर राज्यात तृतीय क्रमांक वेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजार ग्रामपंचायतीला मिळाला होता. या तिन्ही पुरस्कारांचे वितरण राज्यपाल के. विद्यासागर यांच्या हस्ते मुंबईत झाले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात रविवारी करण्यात आला. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात यशवंत पंचायत राज अभियानात तृतीय आल्याने राज्यपाल के. विद्यासागर यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, सुनिल रेडकर यांना रोख १० लाख रुपये सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविले.
राज्यात यशवंत पंचायतराज अभियानात देवगड पंचायत समितीने द्वितीय पारितोषिक पटकाविल्याने राज्यपालांच्या हस्ते रोख रुपये १२ लाख, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सभापती मनोज सारंग, गटविकास अधिकारी विजय चव्हाण तसेच राज्यातील या अभियानांतर्गत तृतीय क्रमांक प्राप्त परुळे बाजार ग्रामपंचायतीचा गौरव रोख रुपये १० लाख देऊन केला. या विविध तीन मिळालेल्या पुरस्कारांमुळे राज्यात सिंधुदुर्ग अग्रेसर ठरला
आहे. (प्रतिनिधी)