वायरमनचा मृत्यू ; अधिकाऱ्यांना घेराओ
By admin | Published: June 25, 2015 12:57 AM2015-06-25T00:57:26+5:302015-06-25T00:59:04+5:30
पिंगुळी परिसरातील ग्रामस्थ संतप्त : पालकर यांच्या कुटुंबातील एकास नोकरी देण्याचे आश्वासन
कुडाळ : पिंगुळी गोंधयाळे मुस्लीमवाडी येथे बिघाड झालेल्या वीज वाहिन्यांचे काम करण्यासाठी खांबावर चढलेले सहाय्यक लाईनमन मधुकर पालकर (वय ५६, रा. पिंगुळी-शेटकरवाडी) यांचा विद्युत तारेच्या उच्च दाबाचा शॉक लागून मृत्यू झाला. हाकेच्या अंतरावर कार्यालय असूनही दीड तासानंतर वीज अधिकारी हजर न राहिल्याने लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना दोन तास घेराओ घातला. संतप्त जमावाला आवरण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. उपअभियंता गौरीशंकर बुरांडे यांनी अनुकंपाखाली कुटुंबातील एकास नोकरी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त जमाव शांत झाला.
तालुक्यातील पिंगुळी-गोंधयाळे येथील मुस्लीमवाडीमध्ये गेले पाच दिवस वीज पुरवठा खंडित झाला होता. वारंवार तक्रार करूनही कंपनी प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी कार्यालयात जाऊन खंडित वीज पुरवठा सुरू करण्यासाठी तक्रार दिली. यासाठी वीज कर्मचारी मधुकर पालकर व विजय खोत आले होते. पालकर यांनी मुस्लीमवाडीतील चार खांबांवर चढून तपासणी केली, पण बिघाड न आढळल्याने ते पाचव्या खांबावर चढले. यावेळी त्यांच्यासोबत असलेले विजय खोत हे पुढील खांबावर तपासणीसाठी गेले. दरम्यान, पालकर खांबावर चढून विद्युत तारांची तपासणी करत असतानाच त्यांना जोराचा शॉक लागून ते खांबावरून जमिनीवर कोसळले. त्यातच त्यांंचा मृत्यू झाला.
दरम्यान, पुढे गेलेल्या खोत यांना काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने ते मागे धावत आले तोच त्यांना पालकरांचा मृतदेह दिसला. त्यांनी तत्काळ वरिष्ठांना याची कल्पना दिली. परंतु दीड तासानंतरही कंपनीचे अधिकारी घटनास्थळी आले नाहीत. तोपर्यंत घटनास्थळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, सभापती प्रतिभा घावनळकर, जिल्हा परिषद सदस्य पुष्पा नेरूरकर, विकास कुडाळकर, सरपंच कोमल सावंत, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रसाद रेगे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले. दीड तासानंतर उपअभियंता गौरीशंकर बुरांंडे घटनास्थळी आल्यानंतर त्यांना लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले. पालकर खांबावर चढल्यानंतर वीज पुरवठा कसा सुरू झाला, पालकरांच्या अपघाती मृत्यूला कंपनीचे बेजबाबदार अधिकारीच कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यावेळी पालकरांचा मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थांनी विरोध केला. ग्रामस्थांच्या प्रश्नांंना बुरांडे यांना योग्य उत्तर देता न आल्याने ग्रामस्थात संतापाची लाट उसळली. संतप्त ग्रामस्थांना आवरण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी उपअभियंता बुरांडे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून पालकर कुटुंबीयातील एकास अनुकंपाखाली नोकरी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.
सहाय्यक लाईनमन विजय खोत यांनी या घटनेचे कुडाळ पोलिसात माहिती दिली. मधुकर पालकर यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहीत मुलगी असा परिवार आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त होता. (प्रतिनिधी)