दोन दिवसात चार हाणामाऱ्या

By admin | Published: March 10, 2015 10:51 PM2015-03-10T22:51:34+5:302015-03-11T00:12:47+5:30

पोलीस कारवाई शून्य : सावंतवाडीत चाललंय तरी काय?

Within two days, there are four clashes | दोन दिवसात चार हाणामाऱ्या

दोन दिवसात चार हाणामाऱ्या

Next

सावंतवाडी : सावंतवाडीत चाललंय तरी काय? असा सवाल नागरिक विचारायला लागले आहेत. दोन दिवसात तब्बल चार हाणामाऱ्या होऊनसुध्दा यातील एकाही घटनेची नोंद पोलीस ठाण्यात नाही. मात्र, ज्या ठिकाणी घटना घडल्या, तेथे पोलीस हजर असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. या हाणामारीत तीन ते चार जण जखमी झाले आहेत. शेवटची हाणामारी सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडीत घडली. याचा विस्तव मंगळवारी दिवसभर शहरात धुमसत होता.
सावंतवाडी हे शांत शहर म्हणून जिल्ह्यात सर्वत्र परिचित आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक तसेच शासकीय अधिकारी हे सर्वात प्रथम सावंतवाडीलाच पसंती देतात. पण याच शांत शहराची शांतता ऐन होळीच्या सणासुदीत धोक्यात आली आहे. याला कारण एकच, ते म्हणजे सावंतवाडीवाडीत गेल्या दोन दिवसात घडलेल्या वेगवेगळ्या हाणामारींच्या घटना. यामुळे शहराची शांतता धोक्यात आली आहे.रविवारी सायंकाळी सावंतवाडी शहरानजीक माजगाव येथे दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत तीन ते चार जणांना चांगलाच चोप देण्यात आला. या घटनेची कुणकुण पोलिसांना लागताच पोलिसांनी माजगाव नाला गाठला आणि प्रकरण मिटवले. परंतु अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने हा वाद अजूनही धुमसत आहे.माजगावचे प्रकरण शमते ना शमते, तोच सोमवारी दुपारी सावंतवाडीतील संचयनी परिसरात दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात एका युवकाच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या हाणामारीची धगधग संपूर्ण शहरात सुरू असताना पुन्हा सायंकाळी संचयनी परिसरातच तुफान हाणामारी झाली. यात दुपारी युवकाला झालेल्या मारहाणीबाबत जाब विचारण्यासाठी दुसरा गट आमने-सामने आला होता. यावेळी दुपारच्या हाणामारीत सहभागी असलेल्या दुसऱ्या गटाला बेदम चोप देण्यात आला. हा प्रकार सायंकाळी ८ वाजल्यापासून ९ वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल एक तास सुरू होता.
तासाभरानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत संचयनी परिसराला मोर्चाचे स्वरूप आले होते. अनेक दुचाकी, वाहने रस्त्यावर उभी होती. बाहेरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना रस्ताही शिल्लक नव्हता. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वाहने बाजूला करण्यात आली. तसेच शंभर ते दीडशे युवकांचा जमाव तेथून निघून गेला. मात्र, पोलिसांनी एकाही युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले नाही, हे विशेष. दरम्यान, सोमवारी घडलेल्या दोन्ही घटनांमधील युवकांना पोलिसांनी कोणताही जाब विचारला नसल्याने त्याचीच पुनरावृत्ती रात्री १ च्या सुमारास शहरात घडली. या घटनेतही रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेतील युवकाला दुसऱ्या गटाने मारहाण केली म्हणून त्याला घरात जाऊन मारहाण करण्यात आली. या घटनांमुळे शहरात अशांतता पसरली आहे. (प्रतिनिधी)


तक्रार देण्यास कोण पुढे येत नाही
सावंतवाडीत हाणामाऱ्या झाल्या, हे खरे आहे. आम्ही पोलीसही घटनास्थळी पाठवले. पण कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नाही. मग पोलीस यंत्रणा तरी काय करेल? तरीही आम्ही खबरदारी घेऊ.
- रणजीत देसाई, पोलीस निरीक्षक

Web Title: Within two days, there are four clashes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.