दस्तनोंदणीसाठी आधारकार्ड ठरणार साक्षीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:03 PM2019-07-29T13:03:55+5:302019-07-29T13:10:29+5:30
: जमीन व मालमता खरेदी विक्रीकरिता दस्तनोंदणी करताना साक्षीदार आणायचे कोठून अशी मोठीच पंचाईत होत असे. साक्षीदारांचे महत्त्व भलतेच वाढलेले होते. मात्र, आता असे व्यवहार करणाऱ्यांचे आधारकार्ड हेच ह्यसाक्षीदार म्हणून मान्य केले जाणार आहे.
प्रकाश वराडकर
रत्नागिरी : जमीन व मालमता खरेदी विक्रीकरिता दस्तनोंदणी करताना साक्षीदार आणायचे कोठून अशी मोठीच पंचाईत होत असे. साक्षीदारांचे महत्त्व भलतेच वाढलेले होते. मात्र, आता असे व्यवहार करणाऱ्यांचे आधारकार्ड हेच ह्यसाक्षीदार म्हणून मान्य केले जाणार आहे.
दस्तनोंदणीसाठी यापुढे साक्षीदारांची आवश्यकताच भासणार नाही. आधारकार्डद्वारे दस्त नोंदणीची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. परिणामी आता दुय्यम निबंधक कार्यालयांमधील साक्षीदारांची गर्दी कमी होणार आहे. तसेच अडथळे दूर होऊन दस्तनोंदणी वेगाने करणे शक्य होणार आहे.
देशात आधारकार्ड नोंदणीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात झाली आहे. आधारकार्ड नाही, अशी व्यक्ती आता सापडणार नाही. आधारकार्ड हा कायदेशीर पुरावा म्हणून महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे अनेक व्यवहारांसाठी आधारकार्ड उपयोगात आणले जात आहे.
राज्यात जमीन खरेदी व विक्रीचे व्यवहार दररोज मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दररोज गर्दी होते. दस्तनोंदणीसाठी आतापर्यंत दोन साक्षीदार त्यांच्या ओळखीच्या कागदपत्रासह हजर करावे लागत होते. त्यामुळे उपनिबंधक कार्यालयांमध्ये खरेदी व विक्री करणाऱ्यांबरोबरच साक्षीदारांनी कार्यालय भरून जात असे.
ही समस्या ओळखून साक्षीदारांची गर्दी कमी करण्यासाठी आता साक्षीदाराऐवजी आधारकार्डच्या आधारे दस्त नोंदणीचा निर्णय शासनाने घेतला असून, नोंदणी महानिरीक्षकांकडून तशा स्वरुपाच्या सूचना दुय्यम निबंधकांना देण्यात आल्या आहेत.
यापुढे ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे त्यांना दस्तनोंदणीसाठी साक्षीदारांना आणण्याची आवश्यकता नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार मालमत्ता खरेदी-विक्री करणाºया व्यक्तीची आधार क्रमांकावरून ओळख पटविण्याची जबाबदारी मुद्रांक नोंदणी विभागाच्या स्वतंत्र प्रणालीला देण्याचा प्रस्ताव भारतीय नागरिकांक प्राधिकरण अर्थात युआयडीएआयकडे सादर केला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे.
सर्व सत्यता तपासणार
दस्तनोंदणीसाठी साक्षीदारांऐवजी आधारचा वापर करताना त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी बायोमेट्रिक मशीनद्वारे ठसे घेतले जाणार आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून हे ठसे तपासले जाणार आहेत. बोटांचे ठसे नोंदणी विभागाच्या स्वतंत्र एमपीएलएसव्हिपीएन या नेटवर्कद्वारे पडताळले जाणार असून, हे नेटवर्क सुरक्षित आहे.
कटकटीतून मुक्तता
रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी येथे दुय्यम उपनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे कार्यालय आहे तर जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये दस्तनोंदणी कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये दररोज दस्तनोंदणीसाठी मोठी गर्दी होते. जमीन, मालमत्ता खरेदी-विक्री करणाºया प्रत्येकाची साक्षीदारांना आणणे, त्यांचे छायाचित्र, ओळखीचा पुरावा तसेच त्यांना स्वाक्षरी होईपर्यंत थांबवणे यासारख्या त्रासांमधून यापुढे आधारकार्डमुळे मुक्तता होणार आहे.
निर्णयाचे स्वागत
उपनिबंधक कार्यालयांमध्ये खरेदी व विक्री करणाऱ्यांबरोबरच साक्षीदारांनी कार्यालय भरून जात असे. मात्र आता ही गर्दी दिसणार नाही. आधारकार्डमध्ये त्या त्या व्यक्तीची सर्वच माहिती एकत्र करण्यात आल्याने आता आधारकार्ड असले की कोणत्याही साक्षीदाराची गरज भासणार नाही. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.