वीज तार अंगावर पडून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 11:48 AM2020-01-29T11:48:34+5:302020-01-29T11:49:41+5:30
विद्युतभारित तार अंगावर पडून गितांजली गुरुदास चोर्लेकर (४४) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना विर्डी येथे प्रजासत्ताकदिनी सकाळीच घडली. काजू बागेतील लाकडे घेऊन घरी परतत असताना काळाने गितांजली यांच्यावर वाटेतच घाला घातला. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दोडामार्ग : विद्युतभारित तार अंगावर पडून गितांजली गुरुदास चोर्लेकर (४४) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना विर्डी येथे प्रजासत्ताकदिनी सकाळीच घडली. काजू बागेतील लाकडे घेऊन घरी परतत असताना काळाने गितांजली यांच्यावर वाटेतच घाला घातला. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
गितांजली चोर्लेकर रविवारी सकाळी गावालगत असलेल्या गणेशकोंड भागातील जंगलात काजू बागायतीत गेल्या होत्या. तेथून जळाऊ लाकडे घेऊन त्या घरी परतत होत्या. मात्र, डोक्यावरील मोळीचा भार जड झाल्याने त्या वाटेत थांबल्या.
काहीवेळ विश्रांतीसाठी त्या एका जागी बसल्या होत्या. यावेळी अचानक तेथील वीज खांबावरील विद्युतभारित तार तुटून त्यांच्या अंगावर कोसळली. त्याचक्षणी त्यांच्या शरीराला आग लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. आजूबाजूला वाळलेले गवत असल्याने परिसरही खाक झाला.
याबाबतची माहिती उमेश साटेलकर यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात दिल्यानंतर दोडामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. गितांजली यांच्या पश्चात पती गुरुदास चोर्लेकर आहेत.