रुग्णवाहिकेअभावी महिलेचा मृत्यू, हलगर्जीपणाचा नातेवाईकांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:56 AM2020-10-06T11:56:46+5:302020-10-06T11:58:16+5:30
CoronaVirus, sindhudurgnews, hospital मालवण शहरातील सोमवारपेठ भागात राहणाऱ्या एका कोरोनाबाधित ६५ वर्षीय महिलेला तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने जीव गमवावा लागला. ग्रामीण रुग्णालयाच्या दिरंगाईमुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली.
मालवण : शहरातील सोमवारपेठ भागात राहणाऱ्या एका कोरोनाबाधित ६५ वर्षीय महिलेला तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने जीव गमवावा लागला. ग्रामीण रुग्णालयाच्या दिरंगाईमुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली.
मालवण ग्रामीण रुग्णालयात येथील सोमवार पेठ भागातील एक ६५ वर्षीय वृद्ध महिला मुलासमवेत दुपारी साडेबाराच्या सुमारास तपासणीसाठी गेली होती. त्याठिकाणी दोघांचीही कोरोना तपासणी झाल्यावर दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्या महिलेला मधुमेहाचा त्रास असल्याने तिला पुढील उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला.
यावेळी महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केली. मात्र, येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले.
संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांसह रुग्णालय प्रशासनाने बोलविलेली १०८ रुग्णवाहिका पाच तासांनी कुडाळ येथून मालवणला आली. त्यानंतर संबंधित महिलेला मुलासह ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
मात्र, रात्री त्या महिलेला आपला प्राण गमवावा लागला. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे त्या कोरोनाबाधित महिलेला प्राण गमवावा लागला. प्रशासनाच्या या दिरंगाई कारभाराबाबत मालवणमधील जनतेतून संताप व्यक्त होत आहे.