मगरीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, शरिराचा काही भाग खाल्ल्याचे आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 02:13 PM2022-12-09T14:13:17+5:302022-12-09T14:15:05+5:30
या घटनेची माहिती पोलीस व वनखात्याला दिल्यानंतर सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे सहकाऱ्यांसह तेथे दाखल झाले
सावंतवाडी : कपडे धुण्यासाठी कारिवडे येथील धरणावर गेलेल्या लक्ष्मी बाबली मेस्त्री (60)या महिलेवर अचानक मगरीने हल्ला केल्याने त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना आज सकाळी उघडकीस आली. लक्ष्मी मेस्त्री या कपडे धुण्यासाठी गुरूवारी दुपारी कारिवडे धरण पात्रात गेली होती.ती सायंकाळी उशिरापर्यंत घरी आल्या नाहीत म्हणून मेस्त्री कुटुंबीयांसह वाडीतील ग्रामस्थांनी शोधाशोध केली होती परंतु त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. शुक्रवारी सकाळी धरण पात्राच्या पाण्यात तरंगत असलेला मृतदेह कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांसह गुराख्यांनी पाहिला. या घटनेची माहिती पोलीस व वनखात्याला दिल्यानंतर सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे सहकाऱ्यांसह तेथे दाखल झाले. त्यानंतर हा हल्ला मगरीने केला असल्याचे लक्षात आले.
पोलीस अधिकाऱ्यांनी वनविभागाला कळवताच वनविभागाचे वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल प्रमोद सावंत सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. यावेळी मंगेश तळवणेकर सरपंच अपर्णा तळवणेकर अशोक माळकर, बाळू माळकर आनंद तळवणेकर, पोलीस पाटील प्रदीप केळूसकर आदिसह अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मगरीने या महिलेच्या अंगाचा काही भाग फस्त केला असल्याचे निदर्शनासआले असून आजही मृतदेह बाहेर काढताना मृतदेहाच्या आजूबाजूला मगरींचा वावर असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. त्यातूनच हा हल्ला मगरीने केल्याचे समोर आले आहे.