Sindhudurg: न्यूमोनियाने सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला अधिकाऱ्याचा मृत्यू
By अनंत खं.जाधव | Published: June 20, 2024 05:42 PM2024-06-20T17:42:53+5:302024-06-20T17:43:37+5:30
सावंतवाडीत डेंग्यू मलेरियाचा मोठा प्रादुर्भाव: प्रशासनाचे दुर्लक्ष
सावंतवाडी : सावंतवाडी गेल्या काही दिवसापासून डेग्यू मलेरियाचे रूग्ण वाढत आहेत. दरम्यानच, नगरपरिषदेच्या सहाय्यक कार्यालय अधीक्षक तथा कर व प्रशासकीय अधिकारी रचना कोरगावकर (वय ३९, रा. पावशी, ता. कुडाळ) यांचे न्यूमोनियाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यांना गेले आठवडाभर ताप येत असल्याचे सांगितले जात आहे.
तालुक्यात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच येथील उपजिल्हा रुग्णालयात ताप सर्दी खोकला यांचे रूग्ण ही आढळून येऊ लागले आहेत. अलिकडेच डेग्यू मलेरिया अशा तापाचे ३० ते ४० रूग्ण मागील आठवड्यात सापडले असताना प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाय योजना करण्यात आली नाही.
दरम्यानच, नगरपरिषदेच्या सहाय्यक कार्यालय अधीक्षक रचना कोरगावकर याचा काल, बुधवारी अचानक मृत्यू झाला. त्या आठवडाभर आजारी होत्या. त्यातून ही त्या कार्यालयात येत असत. मंगळवारी ही त्यांनी सकाळी कार्यालयात येऊन आपले दैनंदिन कामकाज पूर्ण केले. त्यानंतर सायंकाळी घरी गेल्या. पण रात्रीच्या वेळी त्याची प्रकृती खालावली आणि त्यांना कुडाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल, बुधवारी त्यांची प्रकृती आणखी खालवली असल्याने त्याना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात येणार होते. पण तत्पूर्वीच त्यांना श्वसनाचा अधिक त्रास जाणवू लागला आणि त्याचा मृत्यू झाला.
कोरगावकर या पूर्वी कुडाळ नगरपंचायतीत कार्यरत होत्या. सावंतवाडी नगरपरिषद कर्मचारी संघटना तसेच महाराष्ट्र म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियन, सिंधुदुर्ग जिल्हा, नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग यांच्यातर्फे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या घटनेनंतर आता सावंतवाडी शहरातील आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.