अर्भकाला पळविणारी ती महिला मनोरुग्ण
By admin | Published: December 18, 2014 09:51 PM2014-12-18T21:51:10+5:302014-12-19T00:28:05+5:30
दोडामार्ग पोलिसांकडून खुलासा
दोडामार्ग : परिचालिका असल्याचे सांगून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील नवजात अर्भकाला पळवून नेणारी महिला मानसिक रुग्ण असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ही महिला सावंतवाडी तालुक्यातील असनिये येथील असून मानसिक संतुलन बिघडल्याने तिच्याकडून असा प्रकार घडल्याचे दोडामार्ग पोलिसांनी सांगितले.
बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी महिलेकडून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील तीन दिवसांच्या नवजात अर्भकास पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घडला. त्यामुळे खळबळ उडाली होती.
तेथील वार्डबॉय नीलेश बांदीवडेकर याच्या दक्षतेमुळे त्या महिलेला ताब्यात घेण्यास यश आले होते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलीस तपासात ही महिला ही मानसिकदृष्ट्या ठिक नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच ती सावंतवाडी तालुक्यातील असनिये गावची असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या महिलेच्या नातेवाईकांना बोलावून घेत त्यांच्या स्वाधीन केले.
रुग्णालयामध्ये आचारसंहिता हवी
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या या प्रकारामुळे रुग्णालयातील भोंगळ कारभारदेखील पुढे आला आहे. रुग्णालयात बाहेरुन येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी कोणतीच आचारसंहिता नसल्याने असा प्रकार घडल्याचे बोलले जात असून रुग्णांना भेटण्यासाठी आचारसंहिता असण्याची गरज
आहे. (प्रतिनिधी)