महिलेचा अज्ञाताकडून खून

By admin | Published: February 24, 2016 12:09 AM2016-02-24T00:09:43+5:302016-02-24T00:09:43+5:30

लांजातील घटना : महिला अंगणवाडीची मदतनीस; धागेदोरे नाहीत

Woman's blood | महिलेचा अज्ञाताकडून खून

महिलेचा अज्ञाताकडून खून

Next

लांजा : नैसर्गिक विधीसाठी पहाटे घराबाहेर गेलेल्या एका महिलेचा डोक्यात फरशीचे घाव घालून अज्ञाताने खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे लांजा शहरातील शेवरवाडी येथे घडली. मंजुळा राजन नायर (वय ४५, रा. शेवरवाडी, लांजा) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. खुन्याने कोणताच पुरावा मागे न सोडल्याने या खुनाचा शोध घेणे लांजा पोलिसांपुढे एक आव्हान उभे राहिले आहे.
मंजुळा अनेक वर्षांपासून लांजा येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे माहेरचे नाव मंजुळा भगवान मांडवकर असे आहे. केरळ येथील एका तरुणाशी मंजुळा यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये असून, मुलीचा वेरळ येथील महेश गुंड्ये याच्याबरोबर विवाह झालेला आहे, तर मुलगा कामानिमित्त मुंबई येथे राहतो. मंजुळा नायर या आगरवाडी येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात.
शेवरवाडी येथील दिवाकर गजानन आठल्ये यांच्या घराच्या पडवीमध्ये त्या रहात होत्या. संपूर्ण घराचा परिसर व घराची देखभाल करण्याची जबाबदारी घरमालक आठल्ये यांनी त्यांच्याकडे सोपवली होती. घरमालक पुणे येथे असल्याने संपूर्ण परिसरातील झाडे व घराची साफसफाई त्या करत असत. त्यामुळे तिच्याकडून घरमालक भाडे घेत नसत.
मंगळवारी पहाटे ५.३० ते ५.४५ वा. दरम्यान त्या नैसर्गिक विधीसाठी आपल्या पडवीच्या दरवाजाला कुलूप लावून बाहेर पडल्या. अंधार असल्याने हातामध्ये बॅटरी घेऊन त्या जात होत्या. याच दरम्यान अज्ञात खुन्याने फरशीने त्यांच्या उजव्या हातावर व डोक्यात घाव घातला. त्यांचा संपूर्ण चेहरा रक्ताने माखला असून, डोक्याचा चेंदामेंदा झाला आहे. डोक्यात घातलेल्या वर्मी घावामुळे आसपास रक्ताचा सडा उडाला होता. हातातील काचेच्या बांगड्या तुटून आजूबाजूला पडल्या होत्या. अंगावर घातलेला गाऊन पूर्णत: रक्ताने माखला होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घराजवळच विहीर व दुसऱ्या बाजूला शौचालय आहे. त्यांच्या दोन्ही बाजूला माडाची झाडे आहेत. या दोन झाडाच्या मधल्या भागात कोणीतरी महिला झोपलेली असल्याचे जाकादेवी येथून रस्त्याहून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या दृष्टीपथास पडत होती. त्याचबरोबर शेजारी असणाऱ्या विचारे यांच्या येथील भाडेकरुंनी तिला पाहिल्याने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना धक्काच बसला. संपूर्ण चेहरा विद्रूप झाला असल्याने प्रथम चेहरा ओळखणे कठीण होते. शेजाऱ्यांनी व रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांनी मोठी गर्दी करत लांजा पोलिसांना याची खबर दिली.
खबर मिळताच लांजा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक हनुमंत डंगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भागवत, पोलीस उपनिरीक्षक पूनम असवले, हे. कॉ. संजय उकार्डे, शशिकांत सावंत, नंदकुमार सावंत, ललित देऊसकर, सुधीर कुवेसकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. संपूर्ण घराभोवतीचा परिसर पिंजून काढला. त्यानंतर परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक निरज राजगुरु, लांजा-राजापूरचे विभागीय पोलीस अधिकारी मारुती जगताप, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
मंजुळा नायर शेवरवाडी येथे एकट्याच घरामध्ये राहात होत्या. खून झाला तेथे एक अंगठी सापडली असून, ही कुणाची असल्याचे पोलीस खात्री करून घेत आहेत. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पूनम असवले करत आहेत. (प्रतिनिधी)ं

Web Title: Woman's blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.