आंबोली येथे दरीत आढळला महिलेचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 04:03 PM2020-09-08T16:03:24+5:302020-09-08T16:06:21+5:30
आंबोली मुख्य धबधब्यापासून सावंतवाडीच्या दिशेने एक किलोमीटर दरड पडलेल्या ठिकाणी वीस फूट दरीमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आंबोली : आंबोली मुख्य धबधब्यापासून सावंतवाडीच्या दिशेने एक किलोमीटर दरड पडलेल्या ठिकाणी वीस फूट दरीमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सडलेल्या अवस्थेत हा मृतदेह असल्याने ओळख पटविणे पोलिसांसमोर कठीण काम आहे. मात्र, मृतदेह दरीतून वर काढण्यात आला असून, ३५ ते ४० वयोगटातील महिला आहे. तिच्या अंगावर हिरवा रंगाचा ड्रेस असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
लॉकडाऊनमुळे सर्वत्र वाहतूक बंद असतानाच आंबोली घाटात महिलेचा मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ माजली आहे. कोल्हापूर व इस्लामपूर येथील दोन युवक गोवा येथे आपल काम आटोपून परत येत असताना घाटात फोटो काढायला म्हणून थांबले असता त्यांना विचित्र वास आला. त्यांनी वाकुन पाहिल्यानंतर त्यांना त्या महिलेचा मृतदेह दिसून आला. त्यांनी याबाबची माहिती आंबोली पोलीस स्थानकात दिली. '
त्यानंतर आंबोली पोलीस दत्तात्रय देसाई व महेश गावडे हे घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला व शवविच्छेदनासाठी सावंतवाडी आरोग्य केंद्रामध्ये पाठविण्यात आला.
पाच ते सहा दिवसांपूर्वीची घटना
मृतदेह पाच ते सहा दिवसांपूर्वीचा असल्याचा संशय यावेळी पोलिसांनी व्यक्त केला. मृतदेहाच्या शरीरावर हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस होता व पांढऱ्या रंगाची लेगिन्स होती. पायामध्ये काळा मण्यांची पैंजण होती.
आत्महत्या, घातपात तपासाबाबत आव्हान
आंबोलीमध्ये बऱ्याच वर्षानंतर अशी घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा आंबोली चुकीच्या पद्धतीने चर्चेत आल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली होती. लॉकडाऊन व कोरोनामुळे घाट रस्त्यावर वाहतूक कमी असल्याने हा घातपात किंवा आत्महत्या झाली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. याबाबत अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.
मृतेदह बाहेर काढल्यानंतर ही आत्महत्या कि घातपात याचा सखोल तपास करण्यासाठी मृतदेह सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आला आहे. पोलीस याबाबत लवकरच सर्व पोलीस ठाण्यांना माहिती देणार असून, त्यानंतर नेमका मृतदेह कोणाचा ओळख पटविण्यासाठी सोपे जाणार आहे.