महिलेचा ‘लाख’मोलाचा प्रामाणिकपणा
By admin | Published: June 13, 2016 09:19 PM2016-06-13T21:19:29+5:302016-06-14T00:13:41+5:30
सर्वत्र होतेय कौतुक : रेल्वे प्रवासात सापडलेल्या पर्समधील ३० तोळ्यांचे दागिने केले परत
मालवण : अलीकडील काळात चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याने प्रामाणिकपणा लोप पावत चालला आहे. असे असले तरी प्रामाणिकपणा काही व्यक्तींनी अंगी कायमस्वरूपी बाळगला आहे. अशाच एका प्रामाणिकपणाचे दर्शन घडवलेय बदलापूर (नवी मुंबई) येथील अंजली अच्युत गावकर या महिलेने. मूळ देवगड येथील असणाऱ्या गावकर यांनी कुडाळ ते पनवेल रेल्वे प्रवासादरम्यान सापडलेले तब्बल तीस तोळ्याचे किंमती दागिने मूळ मालकाला परत केले आहेत. गावकर यांनी पर्समधील कागदपत्राच्या मदतीने मूळ मालकाचा मोबाईल नंबर मिळवत ‘लाख’मोलाचा ज्वेलरी बॉक्स सुपूर्द केला.
कुडाळ तालुक्यातील पावशी येथील योगिता विकास घारे यांना त्यांचे हरवलेले दागिने परत मिळाल्याचे समाधान मिळाले आहे, तर दुसरीकडे गावकर यांनी माणुसकीचे दर्शन घडवीत केलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पनवेल येथील योगिता घारे या कुडाळ-पावशी येथे लग्न समारंभासाठी आल्या होत्या. लग्नकार्य आटोपल्यानंतर त्या कुडाळ येथून जनशताब्दी एक्स्प्रेसने मुंबईकडे जाण्यास रवाना झाल्या. त्यांच्या डब्यात कणकवलीहून मुंबईकडे जाण्यासाठी देवगड येथील अंजली गावकर या होत्या. घारे कुटुंबीय पनवेलला उतरले. त्यावेळी त्यांची पर्स रेल्वेतच राहिली होती.
गावकर या ठाणे येथे उतरताना घारे यांची पर्स त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ती पर्स ताब्यात घेत बदलापूर येथे घरी गेल्या. त्यांनी पर्स पाहिली असता त्यात एका ज्वेलरी बॉक्समध्ये सोन्याचे तीन हार, दोन बांगड्या, दोन मंगळसूत्र, दोन अंगठ्या असा सुमारे २५ ते ३० तोळे वजनाचा लाखो रुपये किमतीचे दागिने पाहिले. त्यांनतर गावकर यांनी पर्समधील कागदपत्रांचा आधार घेत घारे यांच्याशी संपर्क साधून खातरजमा केली.
त्यानंतर घारे कुटुंबीयांनी बदलापूर येथे गावकर यांच्या घरी जाऊन दागिने ताब्यात घेतले व गावकर यांचे आभार मानले. अंजली गावकर या मुंबई महानगरपालिकेत नोकरीला आहेत. जिल्ह्यातील कर्तबगार महिलेच्या ‘लाख’मोलाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक मालवणचे शिवसेना कार्यकर्ते दीपक मयेकर यांनीही केले आहे.(प्रतिनिधी)
अन् जीव भांड्यात पडला
दरम्यान, योगिता घारे घरी गेल्यानंतर ज्वेलरी बॉक्स रेल्वेतच विसरल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ दादर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी सहकार्य करण्याऐवजी पनवेल पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची सूचना केली. रात्रीची वेळ असल्याने तक्रार नोंदविण्यासाठी सकाळी जाण्याचा निर्णय घारे यांनी घेतला. त्यादिवशी सकाळी गावकर यांनी त्यांना मोबाईलवरून संपर्क साधत पर्स मिळाल्याची माहिती देताच घारे कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. घारे यांनी गावकर यांच्या घरी जाऊन दागिने ताब्यात घेतले.