महिलेचे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र लांबविले, गुन्हा दाखल, मत्स्यगंधामधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 03:27 PM2019-05-27T15:27:18+5:302019-05-27T15:31:02+5:30
मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेचे सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लांबविले. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुडाळ : मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेचे सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लांबविले. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१६ मे रोजी सायंकाळी मुंबईहून मंगलोर येथे जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून यशोदा रामा पुजारी (रा. मंगलोर) या एस-३ या शयनयान बोगीतून प्रवास करीत असताना त्या झोपल्या होत्या. दरम्यान, रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास कुडाळ रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबली असता यशोदा यांना जाग आली. त्यावेळी त्यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळ्याचे मंगळसूत्र गायब होते.
त्यांनी मंगळसूत्र शोधण्याचा प्रयत्न केला मात्र, ते सापडले नाही. ते मंगळसूत्र चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर रात्रीच्या वेळी धावणाऱ्या रेल्वेमध्ये अनेक चोरीच्या घटना घडत असून या चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांना अजूनही पकडण्यात आले नाही. त्यामुळे छोट्या मोठ्या चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.