कोंडये येथील महिला पुरात गेली वाहून !; जोरदार पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 02:58 PM2020-10-15T14:58:54+5:302020-10-15T15:01:56+5:30
rain, kankvali, sindhdurug कणकवली तालुक्यात मंगळवारी दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अचानक ओहोळाला पूर आल्याने कोंडये तेलीवाडी येथील मयुरी मंगेश तेली (वय ३५) ही महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली. रात्री उशिरा पर्यंत शोध घेवूनही ती सापडली नव्हती . दरम्यान, ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी परत राबवलेल्या शोध महिमेत तिचा मृतदेह वाहून गेलेल्या ठिकाणापासून सुमारे दोन किलोमीटरवर आढळून आला आहे
कणकवली : कणकवली तालुक्यात मंगळवारी दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अचानक ओहोळाला पूर आल्याने कोंडये तेलीवाडी येथील मयुरी मंगेश तेली (वय ३५) ही महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली. रात्री उशिरा पर्यंत शोध घेवूनही ती सापडली नव्हती . दरम्यान, ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी परत राबवलेल्या शोध महिमेत तिचा मृतदेह वाहून गेलेल्या ठिकाणापासून सुमारे दोन किलोमीटरवर आढळून आला आहे.
सुदैवाने अक्षता(वय १४ )ही मयुरी तेली हीची मुलगी बचावली आहे. या घटनेची माहिती समजताच तहसीलदार आर.जे. पवार यांनी बुधवारी घटनास्थळी भेट दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयुरी तेली ही महिला आपल्या मुलीला सोबत घेवून गुरे चारण्यासाठी मंगळवारी गेली होती. सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास त्या दोघी घरी परतत असताना मडयेचा व्हाळ करंजे व कोंडये या गावाच्या सीमेवर आल्या. यावेळी तेथील ओहोळ ओलांडत असताना अचानक पुराचे पाणी आल्याने त्या वाहून जावू लागल्या .
यावेळी अक्षता हिने आरडा ओरड केली.मात्र, पाण्याला वेग जास्त असल्यामुळे मयुरी तेली या वाहून गेल्या .सुदैवाने तिच्यासोबत असलेल्या अक्षताच्या हाताला झाडाची फांदी लागल्याने तीने ती घट्ट पकडून ठेवल्याने ती बचावली आहे. घाबरलेल्या अवस्थेत तिने आरडाओरडा करत आई पाण्यात वाहून गेली असे शेजारी व आपल्या घरी जाऊन सांगितले. मात्र, तोपर्यंत मयुरी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती.
या घटनेची माहिती गावातील ग्रामस्थांना समजल्यावर त्यांनी रात्री उशिरा पर्यंत त्या ओहोळाच्या परिसरात मयुरी हिला शोधण्यासाठी मोहीम राबवली.मात्र, मुसळधार पावसामुळे शोध मोहिमेला यश आले नाही .त्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली. दरम्यान , बुधवारी सकाळी ७ वाजता पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली . यावेळी घटनास्थळापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर मयुरी हीचा मृतदेह ओहोळा लगत झाडीत अडकलेल्या स्थितीत आढळून आला .
बुधवारी सकाळी तहसीलदार आर.जे. पवार , संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रथमेश सावंत , माजी सरपंच पत्रकार गणेश जेठे , महसूल विभागातील लिपिक महादेव बाबर , तलाठी मारुती सलाम , मंडळ अधिकारी नीलिमा प्रभूदेसाई , पोलीस उपनिरीक्षक बाबर,पोलीस हवालदार वंजारे यांनी घटनास्थळी भेट दिली. फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात मयुरी तेली हिचे शवविच्छेदन डॉ. सचिन जँगम व आशा सेविका सिमरन तांबे यांनी केले.
घटनास्थळी पोलीस पाटील संदेश मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य उमेश मेस्त्री,सचिन परब, माजी तंटामुक्ती अध्यक्ष आनंद परब, रवींद्र तेली, दिलीप तेली, सिताराम आंबेरकर,दिलीप परब, किरण रेडकर, राजा डिचवलकर,महेंद्र डिचवलकर,संदीप रासम आदींनी मदत केली. मयुरी हीच्या पश्चात पती , मुलगी, सासू , दीर असा परिवार आहे . पोलिसांना या घटनेबाबत संजय रेडकर- तेली यांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला .