महिलांनी बस रोखली ; केसरी येथील प्रकार : आक्रमक पवित्रा घेत केला प्रश्नांचा भडिमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 08:34 PM2019-11-11T20:34:32+5:302019-11-11T20:34:56+5:30
एसटी बस वेळेमध्ये आली पाहिजे, अशी मागणी लावून धरण्यात आली. तसे लेखी द्या, अशीही या महिलांनी मागणी केली. पण आम्हांला लेखी आश्वासन देता येत नाही.
सावंतवाडी : सावंतवाडी-फणसवडे एसटी बस गेले काही दिवस सातत्याने अनियमित वेळेत येत असल्यामुळे संतप्त महिलांनी केसरी येथे बस रोखून धरली. यावेळी महिलांनी आक्रमक पवित्रा घेत वाहक व चालकावर प्रश्नांचा भडिमार केला.
‘आम्हांला एसटी वेळेत सोडणार असे लेखी आश्वासन द्या’, अशी मागणी महिलांनी वाहक व चालकांकडे केली. पण वाहक व चालकाने ‘आज रविवार असल्याने एसटी प्रशासनाचे अधिकारी कोणीही हजर नाहीत. तुम्ही सोमवारी येऊन आगारप्रमुखांशी बोला’, असे सांगितले. पण लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही एसटी सोडणार नाही, असा पवित्रा महिलांनी घेतला.
यावेळी केसरी-फणसवडे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच देवेंद्र सावंत यांनी आपण सोमवारी आगारप्रमुखांशी बोलून एसटीची वेळ सुरळीत करतो, असे आश्वासन दिल्यानंतर यावर तोडगा काढल्यानंतर एसटी पुन्हा रवाना करण्यात आली. मात्र, यापुढे एसटी बस वेळेमध्ये आली पाहिजे, अशी मागणी लावून धरण्यात आली. तसे लेखी द्या, अशीही या महिलांनी मागणी केली. पण आम्हांला लेखी आश्वासन देता येत नाही. सोमवारी यावर प्रशासनाचे अधिकारी तोडगा काढतील, असे सांगितल्यानंतर बस पुन्हा सावंतवाडीकडे रवाना झाली.
चालक-वाहक यांना धरले धारेवर; सरपंचांनी केली मध्यस्थी
सावंतवाडीहून फणसवडेकडे जाण्यासाठी केसरीतून एसटी बस आहे. मात्र, ही एसटी बस अनेक दिवस उशिराने धावत होती. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांत जाणाºया मुलांना किंवा प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे संतप्त महिलांनी ही बस अडविण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे रविवारी सकाळी एसटी बस केसरी येथे अडविण्यात आली. यावेळी महिलांनी चालक-वाहकांना धारेवर धरले. मात्र, रविवार असल्याने कोणताही प्रशासकीय अधिकारी कार्यरत नसल्याने यावेळी सरपंचांच्या मध्यस्थीने त्यावर पडदा टाकण्यात आला.
केसरी येथे संतप्त महिलांनी एसटी बस रोखून धरली.