महिलांचे 'हाफ'तिकीट एसटीसाठी ठरले लाभदायक; सिंधुदुर्ग विभागाला आठ महिन्यात मिळाले 'इतक्या' कोटींचे उत्पन्न
By सुधीर राणे | Published: December 27, 2023 05:56 PM2023-12-27T17:56:15+5:302023-12-27T17:57:22+5:30
कणकवली : महिला सन्मान योजनेंतर्गत एसटी महामंडळाच्या वातानुकुलीतसह सर्व बसेमधून महिलांना प्रवासात अर्धे तिकीट आकारण्यात येत आहे. १७ मार्च ...
कणकवली : महिला सन्मान योजनेंतर्गत एसटी महामंडळाच्या वातानुकुलीतसह सर्व बसेमधून महिलांना प्रवासात अर्धे तिकीट आकारण्यात येत आहे. १७ मार्च २०२३ पासून सुरू झालेल्या या योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. १ एप्रिल २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२३ या आठ महिन्यांच्या कालावधीत एसटीच्या सिंधुदुर्ग विभागात ३ कोटी ११ लाख २९ हजार महिलांनी त्याचा लाभ घेतला आहे. त्यातून या विभागाला ३७ कोटी ८२ लाख १६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे महिलांचे 'हाफ'तिकीट एसटीसाठी लाभदायक ठरत आहे.
या योजनेमुळे एसटीतील महिला प्रवासी संख्या वाढल्याने सिंधुदुर्ग विभागाला ३७ कोटी ८२ लाख १६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर तेवढीच रक्कम शासनाकडून प्रतिपूर्ती रक्कम म्हणून सिंधुदुर्ग विभागाला म्हणजेचे एसटी महामंडळाला मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीसाठी ही योजना एकप्रकारे संजीवनीच ठरणार आहे.
एसटीची प्रवासी संख्या वाढण्यास मदत झाली आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आगारातून सुटणाऱ्या गाड्यांमधून ८ लाख ७ हजार महिला प्रवाशांनी प्रवास केल्यामुळे ८२ लाख ५८ हजार एवढे उत्पन्न मिळाले आहे.
राज्य सरकारने गत वर्षीच्या अर्थसंकल्पावेळी महिलांना ५० टक्के एसटीच्या तिकिटात सवलत देण्याचे जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेनंतर महिला प्रवासी वाढल्यामुळे एसटीचे उत्पन्न वाढले आहे. त्याचा महामंडळाला चांगला फायदा होत आहे. प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा. -अभिजित पाटील,सिंधुदूर्ग विभाग नियंत्रक.