आशिये येथे सुंदरी वादनाचा अद्भुत आविष्कार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:01 PM2019-04-01T12:01:43+5:302019-04-01T12:03:31+5:30
कणकवली शहरालगत असलेल्या आशिये दत्त क्षेत्र येथे गंधर्व फाऊंडेशनतर्फे सत्ताविसाव्या गंधर्व शास्त्रीय संगीत सभेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या संगीत सभेत ऐन मार्च महिन्यात रंग भरले ते सोलापूरच्या गुणी कलावंतांनी.
सुधीर राणे
कणकवली : कणकवली शहरालगत असलेल्या आशिये दत्त क्षेत्र येथे गंधर्व फाऊंडेशनतर्फे सत्ताविसाव्या गंधर्व शास्त्रीय संगीत सभेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या संगीत सभेत ऐन मार्च महिन्यात रंग भरले ते सोलापूरच्या गुणी कलावंतांनी.
उत्तम कलाविष्कार, कलेप्रती आदर, प्रेम, गुरुनिष्ठा आणि संगीताच्या प्रसार प्रचाराचा घेतलेला वसा या सर्वातून सुंदरीवाद्क कपिल जाधव यांनी संगीत रसिकांची मने खऱ्या अर्थाने जिंकली.
सुंदरी वादन म्हणजे नेमके काय? इथपासून सुरु होणारे प्रश्न ते वादनासाठी लागणारी प्रचंड मेहनत या सर्वांची प्रत्यक्ष अनुभूती या संगीत सभेच्या माध्यमातून रसिकानी घेतली. त्याचवेळी सुंदरीच्या मधुर सुरांनी रसिकांच्या डोळ्यात पाणी कधी तरळले ते कळलेच नाही.
गंधर्व फाऊंडेशनने आयोजीत केलेल्या मासिक शास्त्रीय संगीत सभेत कपिल जाधव व त्यांचे बंधू अमोल जाधव यांनी त्यांचे गुरू पं. बलभिम यांच्या साथिने दोन तास सुंदरी वादन केले. त्यांनी विविध राग सादर केले. राग जोग, राग हंसध्वनी, रागमाला, भजन, पहाडी धून अशा आविष्काराने हि संगीत सभा उत्तरोत्तर रंगत गेली . या मैफिलीत प्रसाद लोहार या तबला साथ करणाऱ्या कलावंतानेही उत्कृष्ट वादनाने रसिकांची मने जिंकली.
सिने अभिनेते अभय खडपकर यांनी कपिल जाधव यांच्या घेतलेल्या मुलाखतीमध्ये सुंदरीची उत्पत्ती आणि त्यातील प्रयोगशीलता यावरची चर्चा रसिकांना वेगळेपण सांगून गेली. स्वातंत्र्य पूर्व काळात याच घराण्याने शोध लावलेल्या सुंदरी या वाद्याचा इतिहासही यावेळी कपिल जाधव यांच्या मुलाखतीतून उलघडला गेला.
एका अपरीचीत व विस्मरणात चाललेल्या वाद्याला व त्याच्या निर्माण करत्यांना गंधर्व फाऊंडेशनने व्यासपीठ उपलब्ध करून देऊन आम्हाला उपकृत केले अशी भावना या कलाकारांनी यावेळी व्यक्त केली.
कणकवलीतील संगीतप्रेमी अनंत बडे यांच्या विशेष सहकार्याने हि संगीत सभा पार पडली. हि सभा यशस्वी होण्यासाठी अभय खडपकर, विलास खानोलकर, विजय घाटे, दामोदर खानोलकर, संतोष सुतार, लता खानोलकर , किशोर सोगम, शाम सावंत , सागर महाडिक, मनोज मेस्त्री, राजू करंबेळकर, ध्वनिसंयोजक बाबू गुरव यांनी विशेष मेहनत घेतली.
प्रात:कालीन रागावर आधारित विशेष मैफिल !
नेहमी सायंकालीन रागच ऐकायला मिळतात म्हणून रसिकांच्या आग्रहाखातर २१ एप्रिल रोजी प्रातः समयीच्या रागदारींवर आधारीत २८ वी गंधर्व सभा आशिये येथे आयोजित करण्यात आली आहे. उल्हास कशाळकर यांचे शिष्य निशाद बाक्रे( मुंबई) यांच्या गायनाने ही सभा रंगणार आहे. रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन गंधर्व फाऊंडेशनतर्फे यावेळी करण्यात आले.