इमारतीचे काम रखडले
By admin | Published: February 3, 2015 09:58 PM2015-02-03T21:58:38+5:302015-02-03T23:53:52+5:30
वैभववाडी पंचायत समिती : पदाधिकारी, अधिकारी नाराज; अडीच कोटींचा आराखडा
प्रकाश काळे - वैभववाडी -वैभववाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे काम चार महिन्यांपासून पूर्णत: ठप्प आहे. इमारत बांधकामाचे काम घेतलेल्या ठेकेदाराला जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दोन स्मरणपत्रे पाठविली आहेत. त्याकडेही ठेकेदाराने दुर्लक्ष केल्यामुळे पंचायत समिती पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.पंचायत समितीला स्वत:ची इमारत नसल्यामुळे कारभार कृषीच्या गोदामातून सुरू आहे. गोदामात जागा अपुरी पडू लागल्याने गोदामाला जोडून तेराव्या वित्त आयोगाच्या पंचायत समिती स्तर निधीतून कौलारू शेड काढल्यानंतर विभागनिहाय स्वतंत्र रचना करून कृषी गोदामाला कार्यालयाचा ‘दर्जा’ देण्यात आला आहे. तालुकानिर्मितीनंतर तब्बल ३२ वर्षांनी मंजूर झालेल्या पंचायत समिती इमारतीचे तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी भूमिपूजन केले. त्यामुळे पंचायत समिती पदाधिकारी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते; परंतु मक्तेदाराने खोदाईनंतर चार महिने काम बंद ठेवून सर्वांच्या उत्साहावर विरजण टाकले आहे.२ कोटी ५५ लाखांचा आराखडा माजी आमदार प्रमोद जठार, पंचायत समितीचे सदस्य नासीर काझी, माजी उपसभापती भालचंद्र साठे यांनी पंचायत समिती इमारतीच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार आघाडी सरकारने पंचायत समिती इमारतीच्या २ कोटी ५४ लाख ८४ हजार रकमेच्या अंदाजपत्रकीय आराखड्याला मंजुरी दिली. १७ आॅगस्टला भूमिपूजन झाल्यानंतर १२ सप्टेंबर २०१४ रोजी कार्यारंभ आदेश मक्तेदार सिद्धी असोसिएट्सला जिल्हा परिषद बांधकामने दिले. त्यानंतर मक्तेदाराने इमारतीच्या बांधकामासाठी दिवाळीपूर्वी खोदाई केली. तेव्हापासून पुढील काम पूर्णत: ठप्प आहे. इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी मार्च २०१६ ची अंतिम मुदत आहे; परंतु चार महिन्यांपासून काम ठप्प असल्याने उर्वरित १३ महिन्यांत पंचायत समिती इमारत पूर्ण होण्याची शक्यता धूसर बनली असून, मक्तेदाराच्या विलंबामुळे आराखड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.नोटिसांकडे दुर्लक्ष खोदाईनंतरचे पुढील काम ठप्प झाल्यामुळे चार महिन्यांत ठेकेदार कंपनी ‘सिद्धी असोसिएट्स’ला जिल्हा परिषद बांधकाम विभागाने आतापर्यंत दोन नोटीस पाठविल्या आहेत. परंतु, खात्याच्या नोटिसांकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याचे बांधकाममध्ये बोलले जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागात इमारतीच्या रखडलेल्या कामाबाबत, तर पंचायत समिती सदस्य काझी यांनी मासिक सभेदरम्यान सभागृहात ठेकेदाराकडून कामाला होत असलेल्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गटविकास अधिकारी एस. आर. पाटील यांनीही इमारत बांधकामाच्या विलंबाबाबत जिल्हा परिषद बांधकामकडे विचारणा केली आहे. पंचायत समिती इमारतीचे बांधकाम रखडत चालल्यामुळे पदाधिकारी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.