‘जैतापूर’चे काम पुढील वर्षापासून
By admin | Published: April 18, 2017 11:08 PM2017-04-18T23:08:27+5:302017-04-18T23:08:27+5:30
फ्रान्स शिष्टमंडळाची माहिती : मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट
रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, प्रकल्पाच्या सुरक्षेसंदर्भातही जनजागृती करावी, तसेच या प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात यावीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी फ्रान्सच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळास सांगितले. २०१८ पासून प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल आणि २०२५ पर्यंत पहिला टप्पा कार्यरत होईल, अशी ग्वाही फ्रान्सचे विदेश मंत्री ख्रिश्चन मॅसे यांनी यावेळी दिली.
जैतापूर प्रकल्पासंदर्भात आज ख्रिश्चन मॅसे यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मुंबईमध्ये वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक सूचना केल्या. ऊर्जा विभागाचे सचिव अरविंद सिंह, राजशिष्टाचार विभागाचे सचिव बाजीराव जाधव यावेळी उपस्थित होते. फ्रान्सच्या शिष्टमंडळात फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांडर झायग्लेर, एस. सिओरिटीना, एम. पेन, ई. मिलार्ड, एक्स उर्सेल, फिलिप पॉल, आदींचा समावेश होता.
उद्योगांना आकर्षिक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने उत्तम धोरणे आखली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे भारतातील उद्योगांचे ‘पॉवर हब’ झाले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
जैतापूर प्रकल्पासंदर्भात लोकांमध्ये अनेक प्रश्न व साशंकता आहेत. ही साशंकता दूर करण्यासाठी स्थानिकांबरोबर सुसंवाद साधण्यात यावा. तसेच प्रकल्पाच्या सुरक्षेसंदर्भात काय उपाययोजना राबविणार आहात, याची माहिती स्थानिकांना द्यावी. याशिवाय या प्रकल्पातून निर्मिती होणाऱ्या विजेच्या दराबाबतही स्पष्टता असावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मॅसे म्हणाले की, जैतापूर प्रकल्पात दहा हजार मेगावॅट वीज निर्मिती होणार असून, फ्रान्ससाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम येत्या २०१८ पासून सुरू करणार असून, २०२५ पर्यंत पहिला टप्पा सुरू होईल. तसेच जपानमधील अणुऊर्जा प्रकल्पात घडलेल्या घटनेचा अभ्यास करून जैतापूर प्रकल्पात अशा घटना होऊ नयेत, यासाठी विशेष सुरक्षा यंत्रणा बसविण्यात येणार आहे. तसेच मेक इन महाराष्ट्राच्या धर्तीवर हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनाचे साठ टक्के काम येथेच होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पात स्थानिक उद्योगांना सहभागी करून घेण्यासंदर्भात कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येईल. तसेच स्थानिक कंपन्यांनाही या प्रकल्पात सहभागी करून घेण्यात येणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचे दर हे परवडणारे असतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
स्थानिकांना प्रशिक्षण द्या
जैतापूर प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातील कामाचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. प्रकल्प लवकर सुरू करण्यासाठी स्थानिकांना यामध्ये सहभागी करून घेणे आवश्यक आहे. या प्रकल्पात स्थानिकांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी त्यांना कौशल्य विकासासंदर्भातील प्रशिक्षण देण्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली.