मुंबई-गोवा महामार्गाचे काम रोखले, खारेपाटण ग्रामस्थ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:42 AM2019-02-28T11:42:02+5:302019-02-28T11:44:10+5:30
मुंबई-गोवा महामार्गाचे काम सध्या जोरदार सुरु असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या खारेपाटण भागातून महामार्ग जात आहे. याठिकाणी बॉक्सवेल प्रस्थापित असतानासुद्धा केसीसी बिल्डकॉन कंपनीच्यावतीने सरसकट रस्ता बनविण्याचे काम जोरदार सुरु होते. बुधवारी खारेपाटण ग्रामस्थांनी एकत्र येत मुंबई-गोवा महामार्गाचे खारेपाटण येथे सुरु असलेले कामकाज रोखून धरत बंद पाडले.
सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गाचे काम सध्या जोरदार सुरु असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या खारेपाटण भागातून महामार्ग जात आहे. याठिकाणी बॉक्सवेल प्रस्थापित असतानासुद्धा केसीसी बिल्डकॉन कंपनीच्यावतीने सरसकट रस्ता बनविण्याचे काम जोरदार सुरु होते. बुधवारी खारेपाटण ग्रामस्थांनी एकत्र येत मुंबई-गोवा महामार्गाचे खारेपाटण येथे सुरु असलेले कामकाज रोखून धरत बंद पाडले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, खारेपाटण हे सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारे मध्यवर्त्ती ठिकाण असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. तसेच महामार्गाला लागून मोठी लोकवस्ती आहे. खारेपाटण शहर व मुख्य बाजारपेठ तसेच बसस्थानकाकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. तसेच महामार्गालगत दोन शाळा असून सुमारे २०० विद्यार्थी यामध्ये शिक्षण घेत आहेत.
खारेपाटण दशक्रोशीतील ग्रामस्थांचे व्यापाराचे मुख्य केंद्र व दळणवळणाचे मुख्य ठिकाण म्हणून खारेपाटण शहराकडे बघितले जाते. मात्र या सर्व परिस्थितीचा विचार करता खारेपाटण येथे बॉक्सवेल असणे गरजेचे असून सध्या जे महामार्गाचे काम के.सी.सी. बिल्डकॉनच्यावतीने चालू आहे. त्यामध्ये कुठेच बॉक्सवेल बांधणार असल्याचे दिसत नाही. ही बाब बुधवारी ग्रामस्थांच्या लक्षात येते सर्व खारेपाटण ग्रामस्थांनी एकत्र येत मुंबई-गोवा महामार्गाचे सुरु असलेले काम तत्काळ बंद पाडले.
यावेळी खारेपाटण जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार, खारेपाटण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर कुबल, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, शिवसेना विभाग प्रमुख महेश कोळसुलकर, भाजपचे कार्यकर्ते, भाऊ राणे, चंद्रकांत हर्याण, खारेपाटण सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रमोद नीग्रे, सामाजिक कार्यकर्ते नंदू कोरगांवकण, विजय देसाई, रमेश जामसंडेकर, योगेश गोडवे, संतोष पाटणकर, राजेंद्र वरुणकर, प्रशांत गाठे, संदेश धुमाळे, अण्णा तेली, खारेपाटण स्वाभिमान पक्षाचे युवा कार्यकर्ते मंगेश गुरव आदी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
बॉक्सवेल न झाल्यास उग्र आंदोलन
याच दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कनिष्ठ अभियंता ओटवणेकर, के. सी. सी. बिल्डकॉनचे ज्युनीअर इंजिनीअर पांडे, खारेपाटण सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचे लिपिक पवार यांची ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्गावरच भेट घेऊन चर्चा केली. काम तत्काळ थांबविण्याची विनंती केली.
खारेपाटण ग्रामस्थांच्या प्रश्नावर लवकरच येत्या चार दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरीष्ठ अधिकारी के. सी. सी. बिल्डकॉन कंपनीचे प्रमुख ठेकेदार, स्थानिक प्रमुख ग्रामस्थ, आमदार नीतेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित तातडीची बैठक घेण्यात येणार असून खारेपाटण येथील मुंबई-गोवा महामार्गावर बॉक्सवेल बांधण्यात येईल असे यावेळी उपस्थित असलेले ओटवणेकर यांनी ग्रामस्थांना सांगितले. जर खारेपाटणमध्ये बॉक्सवेल बांधण्यात आला नाही तर सर्व ग्रामस्थांच्यावतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले.