राजकोट किल्ल्यावरील ९३ फूट उंच शिवपुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात; १ मे रोजी लोकार्पण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 07:57 IST2025-04-22T07:56:50+5:302025-04-22T07:57:27+5:30
शिवपुतळ्याचे काम २५ एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याने १ मे रोजी पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे

राजकोट किल्ल्यावरील ९३ फूट उंच शिवपुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात; १ मे रोजी लोकार्पण?
मालवण : राजकोट किल्ला येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे लोकार्पण १ मे रोजी महाराष्ट्र दिनी करण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे काम २५ एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याने १ मे रोजी पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
४ डिसेंबर २०२३ रोजी नौसेना दिनानिमित्ताने मालवण राजकोट किल्ला याठिकाणी किल्ल्याची पुनर्बांधणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच २६ ऑगस्ट २०२४ रोजी पुतळा दुर्घटना घडली होती.
सध्याच्या कामाची स्वतंत्र गुणवत्ता चाचणी होणार
यापूर्वी उभारलेल्या शिवपुतळ्याच्याच दिशेने नवीन शिवपुतळा उभारण्यात येणार आहे. किल्ले सिंधुदुर्गच्या दिशेने शिवपुतळ्याचा दर्शनी भाग असणार आहे. युद्धभूमीतील योद्ध्याच्या आवेशात हा शिवपुतळा असणार आहे. छत्रपतींच्या अंगावर शाल आणि पाठीवर ढाल असणार आहे. शिवपुतळ्याचे आयुर्मान १०० वर्षे असणार आहे. त्याची १० वर्षे देखभाल, दुरुस्ती राम सुतार आर्ट क्रिएशनकडे असणार आहे. सध्या सुरू असलेल्या कामाची स्वतंत्र गुणवत्ता चाचणी, टीमकडून कामाची पाहणी व सर्व चाचण्या घेण्यात येत आहेत.
पहिल्यांदाच बांधकाम विभागाकडे जबाबदारी
- महाराष्ट्रात आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुतळा उभारण्याचे काम केले नव्हते. मुंबईत अरबी समुद्रातील शिवपुतळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उभारण्यासाठी देण्यात आला आहे.
- मात्र, त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. मालवण राजकोट किल्ला येथील शिवपुतळा उभारण्याचे पहिल्यांदाच काम सार्वजनिक बांधकामच्या सावंतवाडी विभागाकडे सोपविण्यात आले आहे.
- मागील शिवपुतळा दुर्घटनेतील त्रुटींवर अभ्यास करून नव्याने उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे काम सध्या जोरात सुरू आहे.
- यासाठी राजकोट किल्ला येथेच तपासणी कक्ष स्थापन केला असून, सर्व बाजूंचा विचार करूनच सार्वजनिक बांधकाम विभाग पावले टाकत आहे.
- राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे काम २५ एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पुतळा जमिनीपासून ९३ फूट उंच, चबुतरा १० मीटर
शिवपुतळा जमिनीपासून ९३ फूट उंचीचा असणार आहे. चबुतरा १० मीटर उंचीचा बनविण्यात आला आहे. त्यावर ६० फूट उंचीचा शिवपुतळा , शिवपुतळ्याच्या हातातील तलवार तब्बल २३ फूट उंचीची असणार आहे. त्यामुळे शिवपुतळा जमिनीपासून ९३ फूट उंचीचा बनविण्यात येणार आहे. पुतळ्यासाठी कांस्य धातूच्या ८ मिलीमीटर जाडीच्या पत्र्याचा उपयोग करण्यात आलेला आहे. यासाठी वापरण्यात येणारे स्टिल हे स्टेनलेस स्टिल आहे. पुतळ्यासाठी ३१ कोटी ७५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. मे. राम सुतार आर्ट क्रिएशन प्रा. लि., गाझिपूर, उत्तर प्रदेश यांच्यामार्फत हा पुतळा उभारण्यात येत आहे. यापूर्वीचा शिवपुतळा हा जमिनीपासून ४० फूट उंचीचा होता.