पाईपलाईनचे काम बंद पाडले, जीवन प्राधिकरणचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 03:46 PM2019-12-12T15:46:09+5:302019-12-12T15:47:32+5:30
बांदा : दोडामार्ग-सासोली ते वेंगुर्ला जाणाऱ्या जीवन प्राधिकरणच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम बुधवारी शेर्ले सरपंच उदय धुरी व ग्रामस्थांनी रोखले. ...
बांदा : दोडामार्ग-सासोली ते वेंगुर्ला जाणाऱ्या जीवन प्राधिकरणच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम बुधवारी शेर्ले सरपंच उदय धुरी व ग्रामस्थांनी रोखले. प्राधिकरण विभागाने स्थानिक ग्रामपंचायतीला कल्पना न देता रस्त्याची खोदाई केल्याचा आरोप धुरी यांनी केला.
यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता अमित कल्याणकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी जीवन प्राधिकरण विभागाने ५३ लाख रुपये बांधकाम खात्याकडे भरले नसल्याचे स्पष्ट झाले.गेले आठ दिवस शेर्ले येथे काम सुरू आहे.
यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीलादेखील कल्पना न देता रस्त्याची खोदाई करण्यात आली. त्यामुळे काम बंद करण्यात आले. यावेळी सरपंच उदय धुरी, शाम सावंत, विराज नेवगी, कामील माडतीस, आनंद चव्हाण, फासकू पावेल, इशद पावेल, अमोल धुरी आदी उपस्थित होते.
काम बंदचा आदेश
जोपर्यंत पैसे भरत नाहीत तोपर्यंत काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाईपलाईनच्या कामामध्ये ज्याठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्ते आहेत त्या रस्त्यांची तोडफोड होणार असल्याने बांधकाम खात्याकडे जीवन प्राधिकरणने १ कोटी ३० लाख रुपये भरण्याचा आदेश दिला होता.
त्यापैकी ७७ लाख रुपये प्राधिकरणने बांधकाम खात्याकडे भरणा केले. उर्वरित ५३ लाखांची भरणा केली नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले. त्यामुळे जोपर्यंत रक्कम वर्ग होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा आदेश अभियंता कल्याणकर यांनी दिला.