निवृत्त कृषी अधिकाऱ्यांच्या कामात घोळ
By admin | Published: August 7, 2015 11:38 PM2015-08-07T23:38:02+5:302015-08-07T23:38:02+5:30
सावंतवाडी पंचायत समिती बैठक : सभापतींनी अहवाल मागविला; सामाजिक वनीकरणचेही वाभाडे
सावंतवाडी : कृषी विभागात निवृत्त कृषी अधिकाऱ्याने मोठे घोळ केले असून, त्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. त्यांचा अहवाल मला द्या, अशी सक्त ताकीद सभापती प्रमोद सावंत यांनी प्रभारी कृषी अधिकारी काका परब यांना दिली आहे. पाणलोटमधील पैसे मागे जाता नये याची नोंद घ्या. बंधारे बांधले त्यांचेही पैसे दिले नाहीत, असे अनेक सवालही यावेळी सभापती यांनी उपस्थित केले. तसेच माजी सभापती प्रियंका गावडे यांनी सामाजिक वनीकरणच्या कारभाराचे चांगलेच वाभाडे काढले.
सावंतवाडी पंचायत समितीची मासिक बैठक आंबोली येथे आयोजित करण्यात आली होती. पण ती कोरमअभावी तहकूब करण्यात आली. ही बैठक शुक्रवारी पार पडली. यावेळी उपसभापती महेश सारंग, प्रभारी गटविकास अधिकारी मोहन भोई, पशु वैद्यकीय अधिकारी एस. व्ही. देशमुख, सदस्या रोहिणी गावडे, प्रियंका गावडे, वर्षा हरमलकर, श्वेता कोरगावकर, गौरी आरोंदेकर, राघोजी सावंत, नारायण राणे, विनायक दळवी, अशोक दळवी यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्य परिवहनबाबत आजच्या बैठकीत अनेक प्रश्न उपस्थित झाले. यात परिवहन मंडळाच्या गाड्या वेळेत जात नाहीत, ज्याठिकाणी विद्यार्थी असतात तेथे गाड्या थांबत नाहीत, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. तर बांदा येथे एसटी बसला वळण घेऊन बस स्थानकात जावे लागते. त्यामुळे पानवळसह अन्य विद्यार्थ्यांना लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे महामार्गावरचे वळण काढून टाकण्यात यावे, अशी मागणी केली. मात्र, त्यावर सदस्यांनी प्रत्यक्षात घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे निश्चित केले. यासाठी सोमवार १० आॅगस्ट हा दिवस निवडण्यात आला आहे. यावेळी एसटी व रस्ते महामार्ग विभागाचे अधिकारी यांना बोलावून घेण्याचे निश्चित करण्यात आले.
तालुक्यात आरोग्याच्या अनेक तक्रारी असताना वैद्यकीय अधिकारी सभागृहातच उपस्थित राहत नाहीत. याबाबत सदस्य अशोक दळवी चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी सभापतींकडे आक्षेप नोंदवला. मात्र, सभापती प्रमोद सावंत यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची बाजू घेत ते बैठकीसाठी गेल्याचे सांगितले.
सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवडीबाबत माजी सभापती प्रियंका गावडे यांनीही आक्षेप घेतला. तालुक्यात अकरा हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असताना प्रत्येक शाळेला फक्त वीस वृक्ष का, असा सवाल उपस्थित केला. तसेच मळगाव, तळवडे तसेच माडखोल येथील वृक्ष चोरीला गेले असून त्यांची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल सभापती प्रमोद सावंत यांनी लागवड अधिकारी भागवत यांना केला. तर उपसभापती महेश सारंग यांनीही भागवत यांना चांगलेच धारेवर धरले.
कृषीबाबत अधिकारी काका परब यांच्या माहितीवर सभागृहाने समाधान व्यक्त केले. मात्र, निवृत्त अधिकारी ईश्वर गुरव यांच्या कामावर खुद्द सभापती प्रमोद सावंत यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, असे सभागृहाला सांगितले. पाणलोटचा निधी मागे जाता नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. तसेच अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना येत्या चार दिवसात नुकसान भरपाई मिळणार असून कृषी विभाग यांचे पंचनामे करणार असून महसूल विभागही मदत देणार असल्याचे यावेळी अधिकारी परब यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
मला चिंता करण्याची गरज नाही
आमच्याकडे बहुमत नसतानाही मी सभापतीची कारकीर्द यशस्वीपणे पूर्ण केली. त्यामुळे मला कोण अविश्वास ठराव आणणार की नाही याची चिंता नाही. माझ्यावर काँग्रेस नेते नारायण राणे यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवणे एवढेच माझे काम आहे, असे मत सावंतवाडी पंचायत समितीचे सभापती प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. ते येथील पंचायत समितीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी सभापती प्रियंका गावडे, सदस्य स्वप्निल नाईक, प्रमोद गावडे आदी उपस्थित होते.
‘त्या’ विषयाबाबत ‘नो कॉमेंटस्’
गटतटाबाबत मला बोलायचे नाही. गटतट क्लोज झाले, असे म्हणत मी काही कारणाने बाहेर गेलो. त्यात सभापतींचा दोष नाही, असे पंचायत समितीमधील शिवशाही गटाचे नारायण राणे यांनी सांगितले. तसेच मला या विषयावर अधिक बोलायचे नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. शुक्रवारी पंचायत समिती बैठक संपल्यानंतर योगायोगाने सदस्य राणे हे सभापती कक्षात अवतरले. यावेळी त्यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांच्या फैरी झाडल्या. पण त्यांनी मोजक्याच प्रश्नांची उत्तरे देत निघून जाणे पसंत केले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांचा फोटो तरी दाखवा
आरोग्याचे तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रश्न असताना तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत करिहोळी एकाही मासिक बैठकीला उपस्थित राहत नाहीत. ते कर्मचाऱ्यांना पाठवतात, याबद्दल सदस्य अशोक दळवी यांनी आरोग्य विभागाचे चांगलेच वाभाडे काढले आणि पुढच्या वेळी निदान त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा फोटो तरी घेऊन या, असे सांगितले.