कणकवलीत पावसाळी डांबर वापरत रस्त्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 07:55 PM2019-07-11T19:55:55+5:302019-07-11T19:56:22+5:30
आंदोलनाची दखल घेत महामार्ग ठेकेदाराने मुख्य चौकात पावसाळी डांबर वापरत बुधवारी रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करत असताना खड्डेमय रस्ता, रस्त्यांवर चिखल, वाहतूक कोंडी, ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी यामुळे विविध पक्षाच्या नेत्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी जनआंदोलन केले होते. आमदार नीतेश राणे यांच्यासह स्वाभिमान कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन करत महामार्ग प्राधिकरण उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केली होती. त्यामुळे अखेर या सर्व आंदोलनाची दखल घेत महामार्ग ठेकेदाराने मुख्य चौकात पावसाळी डांबर वापरत बुधवारी रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
कणकवली शहरातील प्रांत कार्यालयसमोर सर्व्हिस मार्गावर गटार नसल्यामुळे रस्ता गेले दोन दिवस जलमय स्थितीत आहे. या रस्त्यावर दीड ते दोन फूट पाणी साचल्याने पादचारी व वाहनचालकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वारांना या पाण्यातून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सर्व्हिसमार्ग अनेक ठिकाणी खड्डेमय बनले आहेत. ही तर पावसाळयाची सुरुवात आहे. प्रमुख नाले अद्यापही पूर्ण न केल्यामुळे पाणी पुन्हा कणकवलीत शिरण्याची भिती कायम आहे. पथदीप अद्यापही कणकवलीत न लावल्यामुळे रात्रीच्यावेळी काळोखात बुडालेली कणकवली दिसत आहे. तसेच अपघाताच्या घटना घडत आहेत. या सर्व मुद्यांवर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
कणकवली शहरातील प्रश्नांबाबत कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, अतुल काळसेकर, अतुल रावराणे, माजी आमदार विजय सावंत, परशुराम उपरकर , राजन दाभोलकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, अबिद नाईक व इतर नगरसेवक, शिशिर परुळेकर, बाळू मेस्त्री, सामाजिक संघटना, कणकवलीतील नागरिक, वकिल, पत्रकार या सर्वांनीच गेले सहा महिने सातत्याने लढा उभारला होता. तरी देखील महामार्ग प्राधिकरण अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात आला होता. पाऊस सुरु होताच निकृष्ट कामाचे तीनतेरा वाजले. त्यामुळे कणकवलीत आंदोलन पेटत गेले.
अन्य कामेही तत्काळ हाती घ्यावीत
या आंदोलनाचा आवाका राज्य आणि देश पातळीवर गेल्यानंतर सत्ताधाºयांकडून गंभीर दखल घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. शेवटी बुधवारपासून पावसाळी डांबर वापरुन खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अन्य कामे देखील ठेकेदाराने तत्काळ हाती घ्यावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच ही पावसाळयात होत असलेली कामे किती दिवस टिकतील, याबाबाबत शंकाही उपस्थित केली जात आहे.
सिंधुफोटो ०१/०२
कणकवली पटवर्धन चौक येथे बुधवारी दुपारी महामार्ग ठेकेदाराकडून पावसाळी डांबर वापरून रस्ता करण्याचे काम सुरू करण्यात आले. तर दुसºया छायाचित्रात कणकवली प्रांत कार्यालयासमोर पाणी साचले असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.