शिवसेनेच्या कामाचा प्रारंभ कोकणी जनतेच्या आशीर्वादाने
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 06:17 AM2019-09-15T06:17:05+5:302019-09-15T06:17:12+5:30
शिवसेनेच्या कोणत्याही कार्याचा प्रारंभ कोकणच्या जनता जनार्दनाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही.
सिंधुदुर्ग : शिवसेनेच्या कोणत्याही कार्याचा प्रारंभ कोकणच्या जनता जनार्दनाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. आमची ही जनआशीर्वाद यात्रा राजकीय यात्रा नसून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी यात्रेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो आहे. बेरोजगारीमुक्त, दुष्काळमुक्त, सुरक्षित व सुदृढ असा स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा असल्याने तुमचे प्रेम व आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. माझ्याबरोबर तुम्ही असाल तर असा महाराष्ट्र घडविण्यापासून आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही, असा विश्वास युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कुडाळ येथील विजय संकल्प मेळाव्यात व्यक्त केला.
आदित्य यांच्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात वेंगुर्ला येथून झाली. कोकणचे सेनेवर आणि सेनेचे कोकणवर प्रेम आहे. आमचे विद्यमान खासदार, आमदार हे आंदोलनासाठी नाही तर विकासकामांसाठी मला फोन करतात. आमच्या लोकप्रतिनिधींनी इथे विकासाची कामे केली. याचा मला सार्थ अभिमान असल्याचे सांगून त्यांनी कौतुक केले. विरोधकांना इथे इंचभरही जागा शिल्लक राहणार नाही, हे सुभाष देसाई यांनी सांगितले ते मला आता पटत आहे, असे आदित्य म्हणाले.