गोळीबार मैदानाबाबत अफवा पसरविण्याचे काम : दत्तात्रय शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2016 11:08 PM2016-06-03T23:08:35+5:302016-06-04T00:37:55+5:30
या वार्षिक सरावामध्ये ९०५ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सराव केला. यामध्ये एस. एल. आर., ए के-४७, कार्बाइन व पिस्टल यांचा सराव करण्यात आला.
सिंधुदुर्गनगरी : कुडाळ- नेहरूनगर येथील पोलिस गोळीबार मैदान हे पूर्णत: सुरक्षित आहे. या मैदानाबाबत गैरसमज होऊ नये म्हणून सरावाच्या दुसऱ्या दिवसापासून परिसरात पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र सराव पूर्ण होईपर्यंत कोठेही गोळ्या गेलेल्या आढळलेल्या नाहीत. त्यामुळे या मैदानाबाबत गैरसमजातून कोणीतरी अफवा पसरविल्याचे निष्पन्न होत आहे, असे पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी स्पष्ट केले. सोनवडे पार येथे मिळालेल्या ‘त्या’ गोळ्यांची चौकशी मात्र अद्याप सुरू आहे. पाच दिवसात वार्षिक गोळीबार सरावामध्ये २५ हजार १८० गोळ्या झाडण्यात आल्या. यात ३ पोलिस कर्मचाऱ्यांना बेस्ट फायरर म्हणून सन्मानही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कुडाळ-नेहरूनगर येथील लॉँग आर्म फायरींग रेंजबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दत्तात्रय शिंदे यांनी हे गोळीबार मैदान पूर्णत: सुरक्षित असल्याची ग्वाही दिली. ते म्हणाले २८ मे रोजी या गोळीबार मैदानावरील काही गोळ्या सोनवडेपार परिसरात आढळून आल्या. त्यानंतर २९ तारखेपासून सराव पूर्ण होईपर्यंत त्या परिसरात एक पोलिस निरीक्षक, तीन अधिकारी, व २० कर्मचारी तैनात करण्यात आले होते. ज्या माणसांना गोळ्या आढळून आल्या होत्या त्यांनाही घेऊन परिसरात पाहणी केली. मात्र सराव होईपर्यंत तेथे पुन्हा गोळ्या आढळल्या नाहीत. या वार्षिक सरावामध्ये ९०५ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सराव केला. यामध्ये एस. एल. आर., ए के-४७, कार्बाइन व पिस्टल यांचा सराव करण्यात आला. यामध्ये २५ हजार १८० गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र यापैकी एकही गोळी सोनवडे गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात आढळून आली नाही. मात्र सोनवडे-पारमध्ये आढळून आलेल्या ‘त्या’ तीन गोळ्यांचा तपास मात्र अजून सुरू आहे.
गेल्या महिन्यात सावंतवाडी येथील मोती तलावात उडी मारून आत्महत्या केलेल्या कैद्याप्रकरणी त्याला घेऊन जाणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी सावंतवाडी पोलिस उपनिरीक्षक करत आहेत. चौकशी अहवाल प्राप्त होताच याबाबतची आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
एस.व्ही तवटे प्रथम
या गोळीबार सरावामध्ये उत्कृष्ट फायरर म्हणून पोलिस शिपाई एस. व्ही. तवटे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
पोलिस शिपाई आर. सी. सावंत यांनी द्वितीय तर पोलिस शिपाई के. टी. सोनावणे व ए. डी. पवार यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.
हा गोळीबार सराव केल्यामुळे अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचा निशाणा चांगला झाला आहे.