भुयारी गटाराच्या कामाला मुहूर्तच नाही

By admin | Published: August 20, 2016 10:31 PM2016-08-20T22:31:08+5:302016-08-20T22:54:57+5:30

स्वच्छ रत्नागिरीची ऐशीतैशी : डासांचा उपद्रव वाढला

The work of the subdivision is not initial | भुयारी गटाराच्या कामाला मुहूर्तच नाही

भुयारी गटाराच्या कामाला मुहूर्तच नाही

Next

निवडणुकीचे नगारे - ४
मनोज मुळ्ये -- रत्नागिरी --अपार्टमेंट आणि त्यामुळे लोकवस्ती वाढत असताना आवश्यक त्या सुविधा देण्यात रत्नागिरी नगर परिषद खूपच मागे राहिली आहे. गेली अनेक वर्षे शहरातील गटारे बंदिस्त करण्याचे स्वप्न लोकांना दाखवले जात असून, ते पूर्ण करण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाला मुहूर्तच सापडलेला नाही. कदाचित येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा त्यासाठीचे आश्वासन नागरिकांच्या पदरात पडेल.
रत्नागिरी शहरात मारूती मंदिरकडून एस्. टी. स्टँड, मांडवी भागाकडे तीव्र उतार आहे. गटारांमधील सांडपाणी थेट समुद्राकडे वाहून जात असल्याने हा उतार रत्नागिरीकरांसाठी फायद्याचा आहे. कोठेही सांडपाणी साचून राहत नाही. मात्र, त्याकडेही नगर परिषदेचे प्रशासन आणि आजवरच्या राजकीय लोकांनी गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी गटारे उघडीच आहेत.
सुमारे १७-१८ वर्षांपूर्वी शिवसेनेकडून राजन साळवी रत्नागिरीचे नगराध्यक्ष झाले होते. तेव्हा त्यांनी भुयारी गटारे करण्याचा मुद्दा प्रथम मांडला होता. मात्र, तेव्हापासून अजूनपर्यंत गटारे भुयारी झाली नाहीतच, पण त्यावरील लाद्या बसवण्याचे कामही अत्यंत निकृष्ट झाले आहे.
मुसळधार पावसामध्ये रत्नागिरीची ही गटार व्यवस्था चांगलीच उघडी पडते. जिल्हा परिषद, जयस्तंभ, एस्. टी. स्टँड, आठवडा बाजार परिसर यासारख्या भागात पाण्याचे लोट रस्त्यावरून वाहतात. २००५ साली जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा केवळ रत्नागिरी शहरातच १२ इंच पावसाची नोंद झाली होती. त्यावेळी जयस्तंभ परिसराला अक्षरश: महापूर आलेल्या नदीसारखी स्थिती होती. मात्र, त्या घटनेनंतरही नगर परिषदेला शहाणपण आलेले नाही. पाण्याचा निचरा होत असला तरी मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर येते आणि त्यामुळे रस्तेही खराब होतात. मात्र, खराब रस्ते दरवर्षी नव्याने दुरूस्त करण्यात अनेकांना स्वारस्य असल्याने गटारे बंदिस्त असावीत, याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाहीत.
उघड्या गटारांमुळे शहराच्या सर्वच भागांमध्ये डासांचा उपद्रव वाढला आहे. डासांवरील फवारणी हा देखील संशोधनाचाच विषय आहे. मात्र, भुयारी गटारे झाली तर डासांची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आटोक्यात येईल.
रत्नागिरीचा विस्तार झपाट्याने होत असताना अशा गरजेच्या प्रश्नांकडे मात्र सर्वच राजकीय पक्षांनी डोळेझाक केली आहे. निदान येणाऱ्या निवडणुकांमध्ये या प्रश्नावर गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.

लाद्या आवरा
शहराच्या मुख्य मार्गावर काही ठिकाणी गटारांचे काँक्रिट पद्धतीचे काम करण्यात आले आहे. त्यावर सिमेंटच्या लाद्या टाकण्यात आल्या आहेत. मात्र, या कामाला चांगला दर्जा नसल्याने अनेक ठिकाणच्या लाद्या फुटल्या आहेत. त्यातून माणसे गटारात पडण्याचे प्रकारही झाले आहेत. पण नगर परिषदेने त्यात बदल केलेले नाहीत. आता बंदिस्त गटारे नकोत, पण लाद्या आवरा, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
अपेक्षा खूप आहेत
येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षाची निवड थेट लोकांच्या मतदानातून होणार आहे. त्यांना काही काळ निर्धोकपणे या पदावर काम करण्याची संधी आहे. त्यामुळे या पदासाठी उभे राहणाऱ्यांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत.

Web Title: The work of the subdivision is not initial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.