बॉक्सेलला आधार देणाऱ्या भिंतीचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 02:40 PM2020-09-13T14:40:23+5:302020-09-13T14:42:08+5:30
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील गांगो मंदिरासमोर बॉक्सेलला आधार देणाऱ्या भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले आहे. तेथे बाहेर आलेल्या ...
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील गांगो मंदिरासमोर बॉक्सेलला आधार देणाऱ्या भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले आहे. तेथे बाहेर आलेल्या लोखंडी शिगांना केवळ कोऱ्या सिमेंटचा मुलामा काढून करण्यात येत असलेल्या कामाकडे नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी लक्ष वेधले.
या कामात तातडीने लक्ष घालण्याची मागणी त्यांनी कार्यकारी अभियंता सलीम शेख यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी तातडीने कामात सुधारणा करीत योग्य पद्धतीने काम करण्याच्या सूचना दिल्या.
या बॉक्सेल पुलाला आधार म्हणून काँक्रिटचे पिलर उभारले जात आहेत. मात्र, गांगो मंदिरनजीक अशाचप्रकारे आधाराचे काम करताना काँक्रिटमधील शिगा बाहेर दिसत होत्या. त्यावर कामगार सिमेंटचा मुलामा काढत असल्याने या तकलादू कामाबाबत परुळेकर त्यांनी नाराजी व्यक्त करीत काम योग्य रितीने करण्याची मागणी शेख यांच्याकडे केली.
याच ठिकाणच्या अंडरपासच्या ठिकाणी दोन्ही बाजूने गतिरोधक बसविण्याची मागणी सातत्याने करूनही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री येथे चारचाकी व दुचाकी यांच्यात अपघात होऊन एकजण गंभीर जखमी झाला.
याकडेही लक्ष वेधण्यात आले. सुरू असलेल्या या बोगस कामाबाबत ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही ते येत नसल्याने यात जातीने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांमध्ये नाराजीचा सूर
मुंबई-गोवा महामार्गावरील गांगो मंदिरासमोर बॉक्सेलला आधार देणाऱ्या भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून आले आहे. यावर कार्यकारी अभियंता सलीम शेख यांच्याकडे कामात सुधारणा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पिलरचे केलेले काम निकृष्ट दर्जाचे दिसून आल्यामुळे नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.