तिलारी शाखा कालव्याच्या कामगाराची आत्महत्या, रोणापालमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 07:27 PM2019-12-26T19:27:08+5:302019-12-26T19:30:35+5:30
तिलारी शाखा कालव्याच्या रोणापाल (पुरणी) येथील साईटवर काम करणाऱ्या मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. सौरभ समीर अधिकारी (२०, रा. कलकत्ता, सध्या रा. रोणापाल) असे त्या परप्रांतीय कामगाराचे नाव आहे.
बांदा : तिलारी शाखा कालव्याच्या रोणापाल (पुरणी) येथील साईटवर काम करणाऱ्या मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. सौरभ समीर अधिकारी (२०, रा. कलकत्ता, सध्या रा. रोणापाल) असे त्या परप्रांतीय कामगाराचे नाव आहे.
प्राथमिक चौकशीत तेथील कामगार विसंगत माहिती देत होते. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात असा संशयही स्थानिकांनी व्यक्त केला आहे. बांदा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सायंकाळी उशिरा पंचनामा केला. मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदनास आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
मृत सौरभ हा परप्रांतीय कामगार असल्याने आत्महत्येचे कारण अजून समजू शकले नाही, असे पोलिसाकडून सांगण्यात आले.
रोणापाल (पुरणी) येथून जाणाऱ्या कालव्याचे काम सुरू आहे. या कामासाठी मुकादमाने कलकत्त्याहून १२ कामगार आणले होते. मंगळवारी सौरभ याने गावाला जातो असे सांगितले. त्यावेळी मुकादमाने बुधवारी दुपारनंतर कामाचा हिशोब करतो. त्यानंतर तुम्ही गावी जा असे त्याा सांगितले होते.
परंतु मंगळवारी गावी जाणार असा हट्ट त्याने धरला होता. बुधवारी सकाळी तेथील स्थानिक व्यक्तीने पुरणी येथे एक कामगार झाडाला गळफास लावल्याच्या स्थितीत असल्याचे सांगितले. त्यानंतर सोबत असलेल्या दोघांनी जाऊन खातरजमा केली असता तो सौरभ असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती सहकारी कामगार नारायण पाल यांनी दिली.
याची माहिती त्यांनी मुकादमाला दिली व मुकादमाने बांदा पोलिसांना कळविले. याबाबतचा अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.
बांदा आरोग्य केंद्रात मृतदेहाचे विच्छेदन
सायंकाळी उशिरा बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव, पी. एस. माने, चि. टी. कोळेकर यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदनास आणण्यात आला. याबाबतचा अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.