‘दाभोळ’च्या कामगारांचे आठ महिने पगारापासून वंचित
By admin | Published: January 25, 2016 01:00 AM2016-01-25T01:00:38+5:302016-01-25T01:01:10+5:30
भारती शिपयार्ड : दाभोळमधील कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर उद्यापासून उपोषण
दाभोळ : दाभोळ येथील भारती शिपयार्ड कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना आठ महिन्यांचा पगारच देण्यात आलेला नाही. चार वर्षांचा दिवाळी बोनस तसेच अधिक कामाचे पैसेही अदा करण्यात आले नसल्याचे या कामगारांचे म्हणणे असून, या विरोधात २६ जानेवारी रोजी ३९ कामगार कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर उपोषणाला बसणार आहेत.
दाभोळ उसगाव येथील भारती शिपयार्ड कंपनीचा जहाज बांधणी व दुरुस्तीचा प्रकल्प याठिकाणी सुरु आहे. या कंपनीमध्ये दाभोळ उसगाव पंचक्रोशीसह अन्य तालुक्यांतील कामगार कामाला आहेत. मात्र, गेल्या चार वर्षापासून कंपनीला आर्थिक फटका बसल्याने त्याचा परिणाम कंपनीतील कामगारांच्या वेतनावर झाला आहे. या मंदीचा फटका ६०० हून अधिक कामगारांना बसला आहे. या कामगारांना ८ महिन्यांचा पगार, चार वर्षांचा दिवाळी बोनस व २४ महिन्यांची अधिक सेवेची रक्कम मिळाली नसल्याचे या कामगारांनी म्हटले आहे. थकीत राहिलेला पगार व अन्य रक्कमेमुळे कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. या विरोधात कंपनीच्या ३९ कामगारांनी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे कंपनी व्यवस्थापनाला दिला आहे.
कामगारांच्या हितासाठी संघटनाही स्थापन करण्यात आली. मात्र, या संघटनेकडूनही पुरेसे सहकार्य मिळत नसल्याने या असहकार्याविरोधात उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत असल्याचे या कामगारांनी म्हटले आहे. यावर आता कोणता तोडगा निघतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)