अभ्यासाने जग बदलता येते
By admin | Published: April 12, 2015 10:29 PM2015-04-12T22:29:22+5:302015-04-13T00:05:47+5:30
विश्वास नांगरे पाटील : सावंतवाडी येथील कार्यक्रमात प्रतिपादन
सावंतवाडी : अभ्यासाने जग बदलता येते. यामुळे लाथ मारीन तेथे पाणी काढण्याची हिंमत बाळगा व ग्रामीण मुलांनी परिस्थितीच्या आहारी न जाता कुठल्याही क्षेत्रात जाऊन उच्च क्षेत्रात प्रगती करा, असे प्रतिपादन आयपीएस लाचलुचपत विभागीय अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी केले.मनोदय ट्रस्ट, नवोदय अॅकॅडमी, नोबेल स्कॉलॅस्टिक अॅकॅडमी सावंतवाडी आणि भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या संयुक्त विद्यमाने करियर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विश्वास नांगरे पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, उपजिल्हाध्यक्ष राजू राऊळ, सुधीर नाईक, सावंतवाडी नगरपरिषद उपनगराध्यक्ष राजेंद्र पोकळे, महादेव नाईक, पुखराज पुरोहित, माजी आमदार राजन तेली, अन्नपूर्णा कोरगावकर, रेश्मा सावंत आदी उपस्थित होते. स्पर्धा-परीक्षांची माहिती पूर्णत: आत्मसात करणे आवश्यक आहे. तसेच आपल्याबद्दल व आपल्या शत्रूबद्दल संपूर्ण माहिती ठेवा. नाही तर एका युध्दानंतर पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे लढाई यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या गनिमीकाव्याने खेळली पाहिजे. अभ्यास करा व जास्त उंची गाठा. पाच लाख विद्यार्थ्यांमध्ये फक्त १५० जण यशस्वी होतात. या १५० जणांमध्ये येणे आवश्यक आहे.
अणूमध्ये विश्व नष्ट करण्याची ताकद असते. मग आपल्यात का नाही? अशाप्रकारे अनेक उदाहरणे व जीवनातील अनेक प्रसंग यावेळी नांगरे पाटील यांनी सांगितले.
२६/११ दहशतवादी हल्ल्याची माहिती दीड महिने अगोदर असल्याचा गौप्यस्फोट यावेळी नांगरे पाटील यांनी केला.
गुप्तहेर विभागाने दीड महिना या संदर्भात माहिती दिली असून ताज हॉटेलची बैठक ३० सप्टेंबरला घेण्यात आली होती. ताज हॉटेलच्या काचेच्या गेटवर लोखंडी ग्रील बसविण्याचे आदेशही दिले होते. मात्र, लोखंडी ग्रील न बसविल्याने दुर्घटना घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवाय २४ व २५ नोव्हेंबर रोजी ताज हॉटेल जवळील परिसर साफ केला असल्याचेही यावेळी विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. मरणाची सामग्री घेऊन दहशतवादी आले होेते. परिसराची पूर्ण माहिती असल्याने या लढाईत यशस्वी झालो असल्याचे यावेळी नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले. सत्यासाठी संघर्ष केला. प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करीत आलो. तुमची साथ असेल, तर सिस्टिमशी संघर्ष करेन असेही नांगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
पत्र्याची पेटी घेऊन गावातून मुंबईत आलो. ताज हॉटेल, अॅम्बेसिडर हॉटेल, आॅबेराय हॉटेलमध्ये चहा पिण्याचे धाडस नाही. फिल्म स्टारना गेटवरून डोके वर काढून पाहत होतो. मात्र, त्यानंतर वर्षभर कंबरडे मोडेपर्यंत अभ्यास केला व ज्या ताज हॉटेलमध्ये चहा पिण्याचे स्वप्न पाहत होतो, तेच हॉटेल २६/११ ला माझी वाट पाहत होते. फिल्मस्टार मला भेटण्यासाठी दोन-दोन दिवस वाट पाहत होते. हे सर्व अभ्यासानेच होऊ शकते. यामुळे अभ्यासानेच जग जिंकता येते, असेही यावेळी नांगरे पाटील यांनी
सांगितले. (वार्ताहर)