World Tourism Day : पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गात पायाभूत सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 01:14 PM2018-09-27T13:14:42+5:302018-09-27T13:36:30+5:30

सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून १९९९ साली शासनाने जाहीर केला. गेल्या १९ वर्षात या जिल्ह्यात पर्यटनाने कात टाकण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असला तरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात शासन अयशस्वी ठरले आहे.

World Tourism Day: Provide basic amenities in Sindhudurg tourism district | World Tourism Day : पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गात पायाभूत सुविधांची वानवा

आशिया खंडातील नयनरम्य वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे बिच विकासप्रक्रियेत येण्यासाठी वाट पाहत आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देजागतिक पर्यटनदिन विशेष : पर्यटन जिल्ह्यात पायाभूत सुविधांची वानवाविमानतळाबरोबरच सीवर्ल्ड प्रकल्पाची गरज : सुयोग्य रस्ते, नामफलकांचा अभाव, कसे वाढणार पर्यटन

सिद्धेश आचरेकर

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून १९९९ साली शासनाने जाहीर केला. गेल्या १९ वर्षात या जिल्ह्यात पर्यटनाने कात टाकण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असला तरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात शासन अयशस्वी ठरले आहे.

जागतिक पर्यटन दिन साजरा करत असताना जगाच्या नकाशावर जाताना आवश्यक भरारी घेण्यासाठी शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वतंत्ररित्या पर्यटन जिल्हा म्हणून वेगवेगळ्या पातळीवर मदत करण्याची गरज आहे. पायाभूत सुविधांमध्ये जिल्ह्यातील रस्ते, वीज आणि पाण्याच्या समस्या मिटविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न व्हायला हवेत. मात्र, ते त्या त्या पातळीवर होताना दिसत नाही. केवळ पर्यटन जिल्हा म्हणून  टेंभा  मिरविण्यापेक्षा जर चांगल्या सुखसुविधा आणि पर्यटकांना आवश्यक बाबींवर लक्ष दिले तरच पर्यटन जिल्ह्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारता येईल.

जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबरला दरवर्षी साजरा केला जातो. गेल्या १९ वर्षात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने पर्यटन क्षेत्रात कात टाकली आहे. येथील १२० किमीची मनमोहक आणि नयनरम्य किनारपट्टी त्यात सागरी जीवसृष्टीचा आविष्कार असलेला अथांग अरबी समुद्रामुळे येथील पर्यटन व्यवसाय जोमाने बहरत गेला.

सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यानंतर पर्यटकांचा ओढा सिंधुदुर्गात प्रामुख्याने मालवणकडे वाढू लागला. त्यामुळे स्थानिकांनी सुरुवातीला कर्जबाजारी होत पर्यटन व्यवसाय सुरू केले. मात्र याला शासनाचे सहकार्य लाभले नाही. त्यामुळे जगाच्या पर्यटन नकाशावर नावारूपाला येऊ लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मूलभूत सुविधांची वानवा अधिक दिसून येऊ लागली आहे. राजकीय शक्तींनी पुढाकार घेतल्यास जिल्ह्यात पर्यटनातून समृद्धी नक्कीच नांदू शकेल.

पर्यटनाचे महत्व तसेच पर्यटनाची लोकप्रियता पाहता संयुक्त राष्ट्र संघाने २७ सप्टेंबर १९८० ला जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. जागतिक पर्यटन दिवसासाठी २७ सप्टेंबरचा दिवस निवडला गेला कारण याच दिवशी १९७० मध्ये जागतिक पर्यटन संघटनचे संविधान स्वीकारल्या गेले होते.

भारत देशातही पर्यटनाला फार महत्व आहे. त्याप्रमाणे १९९९ पासून पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा राज्यासह देशात नावारूपाला येवू लागला. त्यामुळे मनमोहक व भुरळ घालणाऱ्या किनाऱ्यांचे महत्व वाढू लागले. त्यांनतर पर्यटनाची व्यापकता वाढत गेली. पर्यटन वाढले, पर्यटकांच्या अपेक्षा वाढत गेल्या आहेत. पर्यटकांनी मालवणसह तारकर्ली, देवबाग याच गावांना पर्यटनासाठी अधिक प्राधान्य दिले.

तारकर्ली-देवबागचे अरुंद रस्ते

पर्यटन मालवणात नावारूपाला आल्यानंतर तारकर्ली व देवबाग या दोन गावांनी खऱ्या अर्थाने पर्यटनात क्रांती घडवून आणली. मात्र या गावात जाणारा रस्ता कित्येक वर्षे अरुंद आहे. त्यामुळे पर्यटनाबरोबरच येथे बारमाही वाहतूक कोंडीची समस्या भासते. तसेच खाडीपात्रात गाळ साचल्यामुळे अनेक धोके या गावांना पोहचत आहेत. खाडी किनाऱ्यांचा बंधारा कम रस्ता झाल्यास वाहतूक कोंडीसह देवबाग गाव सुस्थितीत येऊ शकतो. मासेमारीबरोबरच पर्यटन हा प्रमुख व्यवसाय आहे.

सिंधुदुर्ग किल्यावर सुविधांची गैरसोय

ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे. मात्र किल्ल्यावर पायाभूत सुविधांची नेगमीच गैरसमज राहिली. दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देतात, मात्र त्यांना ज्या सुविधा मिळायला पाहिजेत, त्या मिळत नाहीत. याबाबत किल्ला रहिवासी संघाने वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्यावर आश्वासनाकडून कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाही.
 

Web Title: World Tourism Day: Provide basic amenities in Sindhudurg tourism district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.