सिंधुदुर्गनगरी येथे जागतिक योग दिन, ओंकार ध्वनीने योगाचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 03:31 PM2019-06-21T15:31:37+5:302019-06-21T15:34:15+5:30
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 7.30 ते 8.30 या वेळेत हा योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 7.30 ते 8.30 या वेळेत हा योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा कोषागार अधिकारी शिवप्रसाद खोत, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, लेखाधिकारी जगदाळे, योग प्रशिक्षक वैद्य सुविनय दामले, जिल्हा रुग्णालयातील योग प्रशिक्षक साधना गुरव, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्यासह जिल्हा मुख्यालयातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी उपस्थितांना योगाचे महत्व सांगून योग दिना निमित्त शुभेच्छा दिल्या. तर योग प्रशिक्षक वैद्य सुविनय दामले यांनी योग हे अनुभवण्याचे शास्त्र असून प्रत्येकाने प्रामाणिकपणे योग केल्यास दैनंदिन जीवनामध्ये येणारा कामाचा ताण कमी करण्यास व शरीर निरोगी राखण्यास मदत होते असे प्रतिपादन केले.
यावेळी वैद्य सुविनय दामले यांनी योगासनाची विविध प्रात्यक्षीके दाखवली व मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ओंकार ध्वनीने योग प्रात्यक्षिकांची सुरुवात केली. त्यानंतर सुक्ष्म योगाचे प्रकार दाखविले, त्यानंतर त्यांनी वृक्षासन, समांतर चक्रासन, त्रिकोणासन, ताडासन, उष्ट्रासन, अर्धउष्ट्रासन, वज्रासन, कपालभाती, भ्रमरी, उतानपादासन, अर्धहलासन, हलासन, प्राणायम , पवनमुक्तासन, नवकासन, गरुडासन व सर्वात शेवटी शवासनाची प्रात्यक्षिक दाखवली. या प्रात्यक्षिक सादरीकरणामध्ये त्यांना साधना गुरव यांनी साथ दिली.
सुरुवातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी प्रास्ताविकात योग दिनाचे व योगाचे महत्व सांगितले. यावेळी स्काऊट गाईड चे विद्यार्थी व शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.