तिलारी धरणक्षेत्र परिसराची बिकट अवस्था
By admin | Published: January 19, 2017 12:04 AM2017-01-19T00:04:52+5:302017-01-19T00:04:52+5:30
उन्नेयी बंधाऱ्यासह रॉक गार्डन भकास : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने परिसर ओसाड, लोकप्रतिनिधींच्या घोषणा केवळ कागदावरच, पर्यटकांमधून नाराजी
वैभव साळकर ल्ल दोडामार्ग
तिलारी धरणाच्या पर्यटन विकासाच्या मोठमोठ्या बाता राजकीय पुढाऱ्यांकडून मारल्या जात असताना दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र तिलारी धरण परिसरातील बागबगिच्यांची अवस्था अत्यंत बिकट बनत चालली आहे. देखभाल दुरूस्तीचा अभाव आणि प्रकल्प अधिकाऱ्यांची उदासिनता यामुळे एकेकाळी तिलारी धरणाची शोभा वाढविणारा तेरवण-मेढे उन्नेयी बंधाऱ्याचा बगीचा आणि मुख्य धरणाच्या पायथ्याशी असलेल्या रॉक गार्डनची अवस्था भकास बनली आहे.
राजकीय पुढाऱ्यांकडून तिलारी धरणाच्या पर्यटन विकासाच्या मोठमोठ्या बाता मारल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात कार्यवाही मात्र शून्यच असल्याने राजकारण्यांच्या वल्गना म्हणजे ‘बोलाचा भात आणि बोलाचीच कढी’ म्हणावी लागेल. केवळ अशा घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष न दिल्यास तालुक्याचा आणि पर्यायाने तिलारी धरणाचा पर्यटन विकास साधण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेला तिलारी धरण प्रकल्प दोडामार्ग तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी जमेची बाजू आहे. भविष्यातील पर्यटन विकासाच्यादृष्टीने त्याचा विचार करून मुख्य धरणाच्या पायथ्याशी म्हैसूर येथील रॉक गार्डनच्या धर्तीवर बगीचा उभारण्यात आला. त्यासाठी त्यावेळी सुमारे १ कोटी रूपये खर्ची घालण्यात आले. त्यानंतर दरवर्षी त्या बगीचाची देखभाल-दुरूस्ती करण्याचे काम ठेकेदारी पध्दतीवर देण्यात आले. मुख्य धरणाच्या व्ह्यू पॉर्इंटवरील बगीच्याची देखील देखभाल दुरूस्ती करण्याचे काम याच पध्दतीने सुरू होते. त्यामुळे तिलारी धरणाच्या परिसराची शोभा निश्चितच वाढली होती. मुख्य धरणाला लागून असलेला तेरवण-मेढे उन्नेयी बंधारासुध्दा आकर्षून घेत होता. याठिकाणचा बगीचादेखील हिरवागार व निसर्गसंपन्न असल्यामुळे त्याचा फायदा तालुक्याच्या पर्यटन विकासाकरीता होत होता. शैक्षणिक सहली तसेच देशी-विदेशी पर्यटकही तिलारी धरणाला भेट द्यायचे. मात्र, गेल्या दोन वर्षात या बगीचांची देखभाल दुरूस्ती न झाल्यामुळे मुख्य धरणाच्या पायथ्याशी असलेला आणिं तेरवण मेढे उन्नेयी बंधाऱ्यावरील बगीच्याची अवस्था भकास झाली आहे.
तिलारी धरण हा महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचा संयुक्त प्रकल्प असल्याने धरणाला भेट देण्यासाठी शैक्षणिक सहलींच्या माध्यमातून विद्यार्थी तसेच पर्यटकही येत असतात. मात्र, धरण परिसराची भकासतेकडे चाललेली अवस्था पाहून भेट देणारे विद्यार्थी, पर्यटक यांचा हिरमोड होतो. त्यामुळे तिलारी धरणाचे पर्यटनात्मक सौंदर्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.