जखमी गव्याला नैसर्गिक अधिवासात सोडले; भरवस्तीत घुसल्याने उडालेली तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 08:17 PM2021-04-03T20:17:13+5:302021-04-03T20:17:30+5:30
पुन्हा जंगलाच्या दिशेने रवाना करण्यासाठी म्हणून एक वन रक्षक व एक वनमजुर त्या ठिकाणी २४ तास नेमणूक करण्यात आला आहे.
आंबोली : आंबोली जवळील गेळे गावांमध्ये शनिवारी एक गवा डोळ्याला इजा झाल्याने भर वस्तीमध्ये घुसला होता. त्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याला वनविभाग, वन्यजीव संरक्षक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक अधिवासात सोडले. तसेच हा गवा पुन्हा वस्तीत येण्याची शक्यता असल्याने त्याला पुन्हा जंगलाच्या दिशेने रवाना करण्यासाठी म्हणून एक वन रक्षक व एक वनमजुर त्या ठिकाणी २४ तास नेमणूक करण्यात आला आहे.
गेळे परिसरात या गव्याला गेल्या चार दिवसापासून येथील स्थानिक पर्यावरण प्रेमी तथा सामाजिक कार्यकर्ते आनंद गावडे यांनी पाहिले होते. त्यावेळी त्यांच्या एक गोष्ट निदर्शनास आली होती की, त्या गव्याचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत. याबाबत त्यांनी विविध तज्ञांची बोलून याबाबत काही करता येईल का असे विचारले होते. त्यावेळी हा गवा जंगलामध्ये भरकटत होता. परंतु तो भरकटत भरकटत शनिवारी थेट गावाच्या जवळ पोहोचला.
गेळे गावातील एका घराजवळ असलेल्या शेतामध्ये हा गवा भरकटत होता. याबाबतची माहिती आंबोली वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्या ठिकाणी आंबोली वनविभागाचे वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपवनसंरक्षक ए. आर नारनरवर, सिंधुदुर्ग जिल्हा मानद वन्यजीव संरक्षक काका भिसे, तसेच वैद्यकीय अधिकारी सचिन घालवाडकर आदी घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणची पाहणी केल्यानंतर व गव्याचे वयोमान पाहता गव्याला कमीत कमी त्रास व्हावा व तो पुन्हा आपल्या अधिवासात पोहोचावा या दृष्टीने विचारविनिमय करून सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्याला सुरक्षित रित्या जंगलाच्या दिशेने रवाना करण्यात आले., त्यावेळी त्यांना ग्रामस्थांची ही चांगली साथ लाभली. हा गवा पुन्हा गावात येण्याची शक्यता असून जर हा गवा पुन्हा गावाच्या दिशेने आला तर त्याच्यासाठी आवश्यक यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली.
नैसर्गिक अधिवासात हुसकावून लावणे हाच पर्याय
गव्याचे वयोमान पाहता गव्याला बेशुद्ध करून मग त्याला पकडून जंगलात नेऊन सोडणे त्याच्या जीवावर बेतले असते. तसेच नैसर्गिक कारणांमुळे वयोमानामुळे सुद्धा बऱ्याचदा काही प्राणी अगदी मरणाच्या उंबरठ्यावर असताना अशा प्रकारे भरकटतात किंवा त्यांना अंधत्व येते. ते वस्तीच्या जवळ येण्याची शक्यता असते. अशावेळी या वन्य प्राण्यांना नैसर्गिकरित्या त्यांच्या अधिवासात सुरक्षित रित्या हुसकावून लावणे हाच एकमेव पर्याय सुरक्षित ठरत असतो.- अनुज खरे, वन्य प्राणी अभ्यासक, पुणे