अण्णांचे लेखन कैफियत मांडणारे
By admin | Published: January 18, 2015 12:33 AM2015-01-18T00:33:37+5:302015-01-18T00:37:44+5:30
सतीश काळसेकर : अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाला सावंतवाडीत प्रारंभ
सिंधुदुर्ग : अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यातील माणसाविषयीचा लळा हा नेहमीच वरच्या पातळीवर नेणारा आहे. त्यांनी आयुष्यभर आपल्या लेखनातून समाजाची कैफियतच मांडली, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक सतीश काळसेकर यांनी काढले. आज, शनिवारपासून येथे सुरू झालेल्या सहाव्या राज्यव्यापी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
संमेलनाचे उद्घाटन डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी, तर उपस्थितांचे स्वागत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले. काळसेकर पुढे म्हणाले, अण्णा भाऊ साठेंनी लोकनाट्य, पोवाडे, वग, तमाशा, लावणी या पारंपरिक माध्यमांचा आपल्या परिवर्तनवादी संघर्षशील चळवळीसाठी उपयोग करून घेताना भरपूर काळजी घेतली आहे. त्यांनी स्वत:च्या लेखनातून कैफियतवजा लेखन केले असून, त्यांच्या लेखनाला उपहासाची धार आहे; पण अनेकदा अभिजनांच्या लेखनात विनोदासोबत बहुजनांविषयी येणारा तुच्छतावाद त्यांनी जाणीवपूर्वक दूर ठेवला.
आपल्याकडे घटना आणि काळ यांच्या परस्पर संबंधावर प्रकाश टाकणारा स्थल कालपट आपण उभारू शकलेलो नाही. त्याची गरज मात्र सतत जाणवत राहते, असे सांगत श्रमिक प्रतिष्ठानने याआधी काही महत्त्वाची कामे केली आहेत. त्यामुळेच त्यांना आणि सर्वांना भविष्यातही असेच काम करावे लागणार आहे. अण्णा भाऊंच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताचे आणि चारित्र्याचे तपशील अचूक व नेमकेपणाने यायला हवेत. कामाची जबाबदारी नव्या तरुण अभ्यासकांनी केवळ पीएच. डी. पदवी मिळविण्याच्या पातळीवर न घेता तसे संशोधन अधिक अभ्यासपूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी युवकांना केले.
सध्याच्या राजकारणावर प्रकाश टाकताना केंद्रात व राज्यात आलेले भाजपचे सरकार स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या लोकशाहीशी जळवून घेईल असे आपणास वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले. गोविंद पानसरे यांनी प्रास्ताविक, तर नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्वागत केले. प्रा. गोविंद काजरेकर यांनी आभार मानले.
काळसेकर यांनी स्वीकारली सूत्रे
संमेलनाच्या प्रारंभानंतर संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे राजन गवस यांनी सतीश काळसेकर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी कॉ. गोविंद पानसरे, साहित्यिक राजन गवस, माजी आमदार जयानंद मठकर, प्रा. आनंद मेणसे, निवृत्त आयपीएस अधिकारी एस. डी. कांबळे, प्रा. प्रवीण बांदेकर, अॅड. संदीप निंबाळकर, हरिहर वाटवे, डॉ. गोविंद काजरेकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, वैशाली पटेकर, अफरोझ राजगुरू, कीर्ती बोंद्रे उपस्थित होते.