‘यशदा’चे मिनी केंद्र लवकरच रत्नागिरीत
By admin | Published: February 7, 2016 10:24 PM2016-02-07T22:24:21+5:302016-02-08T00:50:56+5:30
साडेदहा कोटी रुपये मंजूर : शासनस्तरावरील प्रशिक्षण जिल्ह्यातच
रत्नागिरी : ‘यशदा’चे मिनी केंद्र रत्नागिरीत होणार असून, त्यासाठी १० कोटी ३५ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातच शासनस्तरावरील प्रशिक्षण मिळणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध योजनांबाबत माहिती व प्रशिक्षण देण्यासाठी पुणे येथे ‘यशदा’चे प्रमुख केंद्र आहे. या मुख्यालयाच्या ठिकाणी विविध प्रशिक्षणे देण्यात येतात. अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी तेथे जातात. यासाठीच ‘यशदा’चे मिनी केंद्र प्रत्येक जिल्ह्यात झाल्यास त्याचा मोठा फायदा कर्मचारी व अधिकाऱ्यांना होणार आहे. ‘यशदा’चे मिनी केंद्र रत्नागिरीत होण्यासाठी गेले काही महिने ‘डाएट’चे प्राचार्य शेख प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती विलास चाळके यांनी दिली. याबद्दल सभापती चाळके यांनी समाधान व्यक्त करुन जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे केंद्र असणे आवश्यक असल्याचे सांगितले. लवकरच हे केंद्र जिल्ह्यात होणार असल्याचे चाळके यांनी सांगितले.
शासनानेही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘यशदा’चे मिनी केंद्र देण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रांसाठी सुरुवातीला राज्यातील २० जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक केंद्रासाठी १० लाख २५ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. हे केंद्र २ एकर जागेत उभारण्यात येणार आहे. उभारण्यात येणाऱ्या ‘यशदा’च्या मिनी केंद्रामध्ये एमपीएससी, युपीएससी व अन्य प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. हे केंद्र जिल्ह्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. (शहर वार्ताहर)
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था.
‘डाएट’चे प्राचार्य शेख यांच्याकडून प्रयत्न सुरू.
जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती विलास चाळकेंचेही प्रयत्न.
केंद्र जिल्ह्यासाठी फायदेशीर.