यशश्रीला हवा मायेचा आधार
By Admin | Published: April 7, 2016 11:41 PM2016-04-07T23:41:13+5:302016-04-07T23:55:13+5:30
आगीने घेतला उर्वरित कुटुंबाचा जीव : तुळस-सिद्धार्थनगर येथील घटना
वेंगुर्ले : आई, बहिणीपाठोपाठ वडिलांनीही कायमचाच निरोप घेतल्याने निराधार झालेली यशश्री मायेच्या माणसांंना पारखी झाली आहे. तिच्या कुटुंबातील कोणीच उरले नसल्याने यशश्रीसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आाहे.वेंगुर्ले तालुक्यातील तुळस-सिद्धार्थनगर येथे गणेश तुळसकर (वय ४0) हे आपली पत्नी द्रौपदी (३५), मुली यशश्री (७) व भाग्यश्री (अडीच वर्षे) याच्यांसोबत राहत होते. गावात मिळेल ते काम करून मोलमजुरीने संसार चालवित होते. शनिवारची रात्र मात्र त्यांच्यासाठी काळरात्र ठरली. शनिवारी ( दि. २ एप्रिल) मध्यरात्री गणेश तुळसकर यांच्या घरातील रॉकेलचा दिवा पडून लागलेल्या आगीत गणेश तुळसकर, त्यांची पत्नी द्रौपदी व मुलगी भाग्यश्री गंभीररीत्या भाजले. या कुटुंबातील एकमेव यशश्री आपल्या काकांसमवेत तुळस-मळी येथील कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी गेल्याने बचावली. या तिघांच्या जाण्याने यशश्री हिचे मातृपितृ छत्र हरपले असून, तिला भगिनीच्या प्रेमालाही मुकावे लागले आहे. निराधार झालेल्या यशश्रीच्या जीवनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या प्राथमिक शाळांच्या परीक्षाही सुरू झाल्या आहेत. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या यशश्रीच्या आयुष्याची सत्वपरीक्षा मात्र त्या आधीच सुरू झाली आहे. आई-वडिलांच्या छत्रछायेला मुकलेल्या व भगिनीच्या प्रेमाला पारखी झालेल्या या यशश्रीला कोण आधार देणार? याची उत्तरे मात्र आज तरी कोणाकडेच नाहीत. (प्रतिनिधी)
यशश्रीला आधार देण्यासाठी तुळस येथील वेताळ प्रतिष्ठानच्यावतीने पुढील दहा वर्षांसाठी तिच्या नावावर दहा हजार रुपयांची कायम ठेव ठेवण्याचा निर्धार तिच्या नातेवाइकांना भेटून व्यक्त केला आहे.