कुणकेश्‍वर यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ!, भक्‍तीचा मळा फुलला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 03:44 PM2022-03-01T15:44:11+5:302022-03-01T15:44:40+5:30

एस.टी कर्मचारी संपाचा काहीसा परिणाम यावर्षी भाविकांच्या संख्येवर झाला आहे

Yatra on Kunkeshwar starts from today | कुणकेश्‍वर यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ!, भक्‍तीचा मळा फुलला

कुणकेश्‍वर यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ!, भक्‍तीचा मळा फुलला

Next

देवगड : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीदेव कुणकेश्‍वर (सिंधुदूर्ग) महाशिवरात्री यात्रोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ झाला. गतवर्षी कोरोनामुळे ग्रामस्तरावर साध्या पद्धतीत हा उत्सव पार पडला होता. मात्र, यावर्षी कोरोना नियमांचे पालन करून यात्रोत्सव होणार असल्याने कुणकेश्‍वर यात्रेत पुन्हा भक्‍तीचा मळा फुलला आहे.

यात्रा कालावधीत देवदर्शन व तीर्थस्थानाकरिता भाविकांचा महासागर उसळण्याची शक्यता आहे. मात्र, एस.टी कर्मचारी संपाचा काहीसा परिणाम यावर्षी भाविकांच्या संख्येवर झाला आहे.

यावर्षी कुणकेश्‍वर भेटीसाठी भरतेश्‍वर मसुरे व पावणाई रवळनाथ मालोंड या दोन देवस्वार्‍या तिर्थस्नानास येणार आहेत. बुधवारी पहाटेपासून समुद्र किनार्‍यावर धार्मिक विधी,देवस्वार्‍यांचे व भाविकांच्या तिर्थस्नानाला सुरुवात होईल. देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांना दर्शन घेणे, मंदिर परिसर व समुद्र किनारी जाणे यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

देवस्थान ट्र्स्ट तसेच ग्रामपंचायत यांच्यावतीने प्रत्येक व्यापार्‍यांना दुकानाच्या सीमा ठरवून दिल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची मिठाई, हॉटेल्स, मालवणी खाजा, कापड दुकाने यांनी यात्रा परिसर फुलुन गेला आहे. यावेळी यात्रेच्या ठिकाणी पारंपारिक शेती अवजारे मोठ्या प्रमाणात विक्रीस आली आहेत. त्याचप्रमाणे क्लोज सर्किट कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. अधिकारी व कर्मचार्‍यांसहीत एकूण ३८० पोलिस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत.

आरोग्य विभागाकडून चोख व्यवस्था!

आरोग्य विभागामार्फत ६४ कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी १, आरोग्य अधिकारी १२, समुदाय आरोग्य अधिकारी ६, आरोग्य पर्यपेक्षक १, आरोग्यसेवक १३, आरोग्यसेविका १२, परिचर ६, आरोग्य सहाय्यक ८, रूग्णवाहीका चालक ५ असे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.२४ तास वैद्यकीय सेवा देण्यासाठी दोन पथके कुणकेश्‍वर प्राथमिक शाळा, भक्तनिवास येथे कार्यरत राहणार आहेत.पाणीशुध्दीकरण आणि पिण्याचा पाण्याची तपासणी यासाठी दोन पथके कार्यरत आहेत.

वीज वितरणकडून नियोजन!

कुणकेश्‍वर यात्रा कालावधीत वीजप्रवाह सुरळीत राहण्यासाठी वीज वितरणची टीम तैनात करण्यात आली आहे. जामसंडे सबस्टेशन, तळेबाजार सबस्टेशन येथून दोन फीडरवरून वीजप्रवाह सुरळीत ठेवण्यात येणार आहे.वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता १, शाखा अभियंता ७ व दोन शिफ्टमध्ये २६ कर्मचारी तैनात आहेत.

देवगड व विजयदुर्ग आगारातून १३ फेर्‍या!

कर्मचार्‍यांचा संपाचा फटका एस.टीला बसला आहे. मात्र, यात्रेसाठी देवगड व विजयदुर्ग आगारातून एकूण १३फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे.देवगड एसटी आगारातून एकूण १० फेऱ्या होणार असून यामध्ये देवगड आगारातून ८, जामसंडे १ व तळेबाजार १ अशा फेर्‍या सोडण्यात येणार आहेत तर विजयदूर्ग आगारातून तीन फेर्‍या सोडण्यात येणार आहेत.

पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन!

दरवर्षीप्रमाणे वाहतुकीचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तारामुंबरी- मिठमुंबरी पुलामुळे देवगडकडील बहुतांशी वाहतुक ही पुलावरून होणार असल्याने वाहतूक कोंडी कमी प्रमाणात होईल.तीन ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रवाशांसाठी मोफत बससेवा!

देवगड जामसंडे नगर पंचायत हद्दीतील कुणकेश्‍वर यात्रेस जाणार्‍या भाविकांसाठी शिवसेना नगरसेवक विशाल मांजरेकर यांनी त्यांच्या साई ट्रॅव्हलर्सची मोफत बससेवा १ मार्च रोजी सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत ठेवली आहे.खाकशी तिठा, दिर्बादेवी स्टॉप,जामसंडे बाजारपेठ, वडांबा, फाटक क्लास, शिवसेना शाखा, मांजरेकर नाका, ब्राम्हणदेव मंदिर तारामुंबरी नाका ते कुणकेश्‍वर असे नियोजन केले आहे.

Web Title: Yatra on Kunkeshwar starts from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.