सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ ते ४ जून कालावधीत 'यलो अलर्ट', दक्षतेच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 12:08 PM2024-06-01T12:08:43+5:302024-06-01T12:08:58+5:30
सिंधुदुर्गनगरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ ते ४ जून या कालावधीत यलो अलर्ट ...
सिंधुदुर्गनगरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ ते ४ जून या कालावधीत यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच या कालावधीत जिल्ह्यात गडगडाट होऊन पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता असून ताशी ४० ते ५० किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
या कालावधीत विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब राहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.
विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये
वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाइलवर ‘दामिनी अप’ डाऊनलोड करून घ्यावे. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये, मोबाइलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर राहावे, अशी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.