तुम्ही मंत्रीपदी आहात मग कोणता विकास केलात? रूपेश राऊळ यांचा मंत्री केसरकरांना सवाल
By अनंत खं.जाधव | Published: February 2, 2024 03:25 PM2024-02-02T15:25:46+5:302024-02-02T15:26:10+5:30
आपल्यासोबत कोणीच नाही समजल्यामुळे मंत्री केसरकरांना नैराश्य आल्याचेही आरोप
अनंत जाधव, सावंतवाडी : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतना कोकणला काय दिले हे विचारण्यापेक्षा तुम्ही मंत्रीपदाच्या काळात कोणता विकास केला? तो आधी सांगा नंतर उध्दव ठाकरेवर टिका करा आता तुमच्या सोबत कोण राहिले नाहीत म्हणून तुम्ही वैफल्यग्रस्त झाला आहात अशी जोरदार टिका शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केली आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, अशोक परब, अशोक धुरी, आबा केरकर आदी उपस्थित होते.
राऊळ म्हणाले, 4 फेब्रुवारीपासून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहे. तत्पूर्वी ते राज्यात काढण्यात येणार्या संवाद यात्रेची सावंतवाडीतून सुरुवात करणार आहेत. यावेळी त्यांचा सावंतवाडीतील शिवसैनिकांच्या माध्यमातून जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. येथील गांधी चौकात हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा दावा राऊळ यांनी केला.मंत्री केसरकर यांनी ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेला ही त्यांनी प्रत्युत्तर दिले ठाकरेंनी अडीच वर्षात काय केले? हे विचारण्यापेक्षा तुम्हाला ठाकरेंनी च मंत्री केले हे विसरू नका आता गेली वीस महिने तुम्ही मंत्रीपदी आहात मग तुम्ही काय केले? याचे उत्तर जनतेला द्यावे.
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटला प्रश्न सोडवू शकला नाहीत,कुणाला किती रोजगार दिले ते सांगा, स्वतः मंत्री असलेल्या शिक्षण खात्यातील बेरोजगार युवकांना न्याय देवू शकलात नाहीत, कबुलायतदार गावकार प्रश्न सुटला असे जाहीर केले तरी तो प्रश्न अंधातरीच आहे. त्यामुळे त्यांना आमच्या नेत्यांवर बोलण्याची नैतिकता नाही.असा सल्ला ही राऊळ यांनी दिला.
या ठिकाणी आपल्यासोबत आता कोणीच नाही हे समजल्यामुळे मंत्री केसरकरांना नैराश्य आले आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त होवून ते टिका करीत सुटले आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आल्यांनतर मंत्री केसरकर यांनी माझ्या विरोधात बोलले तर मी त्यांच्या मतदार संघात जावून बोलेन, असे सांगितले होते. तोच कित्ता आज ते गिरवत आहेत. मात्र ठाकरे कुटुंबाला बोलण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तुम्ही त्याच्या नादी लागू नका तुम्हाला धू-धू-धुतील असेही राऊळ म्हणाले.